शुभम वाकचौरे
जांबूत, (पुणे) : फॅब्रिकेशन व्यावसायिकाच्या दुकानाचे शटर उचकटून दुकामातील ५० हजार रुपयांचे साहित्य व मशिनरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (ता. १३) सकाळी उघडकीस आली आहे.
याप्रकरणी विजय ज्ञानदेव पळसकर यांनी टाकळी हाजी दूरक्षेत्र पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहमीप्रमाणे पळससकर यांनी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास दुकान बंद करून घरी झोपण्यासाठी गेले. यावेळी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पोलीस भरतीचे सरावासाठी आलेल्या मित्राने दुकानाजवळ सायकल लावली होती. यावेळी दुकान उघडले असल्याचे निदर्शनास आले.
यावेळी दुकानात जाऊन पाहणी केली असता दुकानातील दोन ड्रील मशीन, ग्रॅंडर मशीन, बॅटरी, कॅमेरा, तीनचाकी गाडीचे खरेदी केलेले इंजिन, दोन आयरणी, एक ट्रॅक्टर बॅटरी व केबल व इतर वस्तू चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.
दरम्यान, सदर घटनेची माहिती पोलिसांना दिली असता सदर ठिकाणी शिरूर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक सुनील उगले, पोलीस कॉन्स्टेबल दिपक पवार, विशाल पालवे यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. पुढील तपास शिरूर पोलीस करीत आहेत.