तेलंगणा: तेलंगणामधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. वर्गमित्र असलेल्या प्रियकरासोबत राहण्यासाठी एका महिलेने पोटच्या 3 मुलांची हत्या केल्याचा खळबळजनक घटना समोर आली आहे. या मुलांपैकी एक 12 वर्षांचा, दुसरा 10 वर्षांचा आणि तिसरा 8 वर्षांचा होता. याप्रकरणी पोलिसांनी 30 वर्षीय रजिता व तिचा प्रियकर शिवकुमार यांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रजिता आणि चेन्नईय्या यांचे लग्न 2013 मध्ये झाले होते. त्यावेळी रजिता 30 वर्षांची आणि चेन्नईय्या 50 वर्षांचे होते. चेन्नईय्या टँकर चालक आहेत. दोघांच्या वयात जास्त अंतर होते. त्यामुळे त्यांच्या नात्यात कटुता होती. दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. सहा महिन्यांपूर्वी रजिता तिच्या शाळेच्या गेट टु गेदरला गेली असता तेथे आरोपी शिवकुमार आणि रजिता यांची भेट झाली.
दरम्यान त्यांच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. त्यांचे प्रेम पुन्हा जिवंत झाले. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. शिवकुमारने तिच्या सोबत राहण्यासाठी एक अट ठेवली. तु मुलांपासून वेगळी झालीस तरच तुझ्यासोबत लग्न करीन अशी अट ठेवली. यानंतर रजिताने तिच्या मुलांना आणि पतीला मारण्याचा कट रचला.
त्यानंतर कट रचत रजिताने तिच्या मुलाचा टॉवेलने गळा दाबून खून केला. तिचा नवरा घरी आल्यानंतर माझ्या पोटात खूप दुखत आहे. दही-भात खाल्यामुळे माझी आणि मुलांची तब्येत बिघडली असे तिने सांगितले. त्यानंतर चेन्नईया आणि आजूबाजूच्या लोकांनी मुलांसह रजिताला रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांना संशय आला त्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली.
दरम्यान, पोलिसांनी रजिताची कसून चौकशी केली. त्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आला. चौकशी अंती रजिताने आपल्या 3 मुलांचा गळा दाबून खून केला असल्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी शिवकुमार आणि रजिताला अटक केली आहे.