पुणे : घरासमोरील पडीक जागेत कुत्री फिरतात. त्यांच्यामुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून एकाने तीन कुत्र्यांचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार रामनगरमधील सिद्धार्थनगर येथे १ मार्च रोजी घडला होता.
अनिकेत संजय राजपूत (वय २८, रा. वारजे माळवाडी) यांनी वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी नागेश सोनवणे (रा. सिद्धार्थ चौक, रामनगर, वारजे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ चौक येथील बापू घनगांवकर यांच्या मोकळया पडीक जागेत कुत्री फिरत असतात. त्याचा त्रास होत असल्याने नागेश सोनवणे याने या कुत्र्यांच्या पिल्लांना उंदीर मारण्याचे विषारी औषध खाण्यातून दिले. त्यामुळे तेथील तीनही कुत्र्यांच्या पिल्लांचा मृत्यु झाल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक काळे तपास करीत आहेत.