जिंती : भिलारवाडी (ता. करमाळा) ग्रामपंचायत हद्दीतील मकाई सहकारी साखर कारखान्याजवळ असलेल्या हॉटेल अमोल बिअर बार, परमिट रूम अँड लॉजिंगच्या नावाखाली खुलेआम सुरु असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश करण्यास करमाळा पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी बनावट ग्राहक तरुण करून लॉजवर सोमवारी (ता.२४ ) रात्री छापा टाकून ६ महिलांची सुटका केली आहे. तर लॉज मालकासह १० जणांना अटक केली आहे.
हॉटेल व लॉज मालक राजेंद्र मुरलीधर वालेकर (रा. भिलारवाडी, ता. करमाळा, जि. सोलापूर), लॉजचा व्यवस्थापक अजितकुमार जयसिर शेट्टी (वय ३७, रा. होसूर निड्युटी होसमाने, ता. कुंदापूर, जि. उडपी, कर्नाटक), हॉटेलच्या मॅनेजरचा मदतनीस सोहेल गुलमहंमंद अन्सारी (वय २१, रा. राहबाद, ता. देवीपुर, जि. देवघर, झारखंड), सागर बाळासाहेब जाधव (दोघे रा. पाळसमंडळ, ता. माळशिरस), अक्षय विश्वास ओहोळ, निखिल राजेंद्र गाडेकर (दोघे रा. पिंपळगाव, ता. दौड), महेश पांडुरंग जाधव, गणेश दिलीप जाधव व तात्या रामचंद्र जाधव (तिघे रा. नीर वांगी, ता. इंदापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहित शिंदे यांनी सरकारच्या वतीने करमाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिलारवाडी (ता. करमाळा) ग्रामपंचायत हद्दीतील अमोल हॉटेलवर खुलेआम वेश्याव्यवसाय सुरु आहे. अशी माहिती पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री असता, लॉजच्या खोल्यांमध्ये ६ महिला वेश्याव्यवसाय करताना आढळून आल्या.
दरम्यान, या कारवाईत पोलिसांनी ६ महिलांची सुटला केली आहे. तर लॉज मालकासह १० जणांवर अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम १९५९ – 3,4,5 नुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
खेडेगावातही वेश्याव्यवसायाला आला ऊत
करमाळा तालुक्याला आता वेश्या व्यवसायाचे ग्रहण लागलं आहे. करमाळा तालुक्याची सांस्कृतिक, राजकीय आणि शैक्षणिक केंद्र म्हणून ओळख आहे. पण हेच करमाळा तालुक्यातील कोर्टी आता वेश्या व्यवसायाचं देखील केंद्र बनले आहे. करमाळा शहरातील कर्जत रस्त्यावरील लॉजवर सुरु असलेल्या वेश्याव्यवसायावर पोलिसांनी छापा टाकून सन २०२१ साली कारवाई केली होती. त्यानंतर या व्यवसायाचे लोण आता वीट, कोर्टी आणि भिलारवाडी अशा खेडेगावातही पोहचले आहे. त्यामुळे येथून पुढची पिढी बरबाद झाल्याशिवाय राहणार नाही. अशी चर्चा नागरिकांमध्ये चांगलीच रंगली आहे.