लोणी काळभोर : घरासमोर खेळत असताना, एका ८ वर्षाच्या मुलाचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील पांडवदंड रस्त्यावरील वाकवस्ती परिसरात बुधवारी (ता.२६) सकाळी आकारा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.
याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
एकमत गणेश सोनी (वय ०८ वर्षे ०३ महीने) असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी एकमतचा मामा
दिलीप जीवन कुमार (वय २२,पांडवदंड रोड, वाकवस्ती, कदमवाकवस्ती, ता. हवेली, मुळ रा. सूबानचौर, चौकुणे जिल्हा सुरखेत, नेपाळ) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप कुमार हे चायनीजच्या स्टॉलवर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. फिर्यादी यांचा भाचा एकमत हा गुरुवारी (ता.२६) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास राहत्या घराच्या समोरील अंगणात खेळत होता. मात्र तो दिसेनासा झाला. त्यानंतर एकमतच्या घरच्यांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. मात्र तो आढळून आला नाही.
दरम्यान, एकमतला कोणीतरी अज्ञात इसमाने फुस लावून पळवुन नेल्याचा संशय आल्यानंतर, दिलीप कुमार यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात धाव घेतली. व एकमतचे अपहरण झाल्याची फिर्याद पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार करीत आहेत.
८ वर्षाचा परप्रांतीय मुलगा एकमत हा बेपत्ता झाला आहे. त्याचा चेहरा गोल असून त्याच्या अंगात पिवळा व काळ्या रंगाचा रेषा ओढलेला शर्ट परिधान केलेला आहे. अशा वर्णनाचा मुलगा जर कोणास आढळल्यात त्यांनी लोणी काळभोर पोलिसांशी तत्काळ संपर्क साधावा. असे आवाहन लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी केले आहे.