पुणे- मॉलमध्ये खरेदीला जाण्यापुर्वी नवरोबाची परवानगी न घेतल्याच्या कारणावरुन, नवरोबाने थेट बायकोची दोन बोटेच छाटल्याची धक्कादायत घटना रुई (ता. बारामती ) येथे घडली आहे. नवरोबाने कोयत्याच्या साह्याने केलेल्या हल्ल्यात पत्नीची करंगळी व त्याच्याशेजारील बोट छाटले गेले आहे. ही घटना चार दिवसापुर्वी घडली आहे.
दीपाली सुदर्शन जाधव (सध्या रा. बयाजीनगर, रुई, बारामती, मूळ रा. किणी, ता. आष्टी, जि. बीड) हे बोटे छाटलेलेल्या महिलेचे नाव असुन, दिपाली यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बारामती पोलिसांनी, दिपालीचा पती, सुदर्शन रणजित जाधव याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
बारामती तालुका पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदर्शन व दिपाली हे पती-पत्नी मागिल दहा वर्षापासुन बारामतीत रहातात. दोघेही मिळेल त्या ठिकाणी काम करुन, आपली उपजिवीका करतात. 10 ऑगस्ट रोजी फिर्यादी महिला तिच्याकडील दुचाकीवरून बारामती शहरात खरेदीसाठी गेली होती. त्यावेळी तिचा पती कामाला गेला होता. पती कामावरुन घऱी आला असता, दिपाली घऱी नसल्याचे त्याला दिसुन आले. यावर सुदर्शन याने मोबाईल फोनवरुन दिपालीला फोन केल्यावर ती खऱेदीला गेल्याचे समजले.
दरम्यान खऱेदीनंतर दिपाली रात्री पावणे आठच्या सुमारास घरी आली असता, सुदर्शन याने खऱेदीला जाण्यापुर्वी परवानगी न घेता घराबाहेर का गेलीस असे म्हणत तिला मारहाण करण्यास सरुवात केली. दोघांच्यात वाद वाढत चालला असतांना, रागाच्या भरात सर्दर्शन याने दिपालीच्या हातावर कोयत्याने वार केला. या हल्ल्यात पत्नीची करंगळी व त्याच्याशेजारील बोट तुटले तसेच तिच्या डाव्या हातावरही गंभीर दुखापत झाली आहे. या जखमी महिलेवर बारामतीत उपचार सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.