समस्तिपूर : कोलकात्यातल्या आर. जी. कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती याचे पडसाद संपूर्ण देशात उमटले होते. हे प्रकरण ताज असतानाच बिहारमध्ये एका खासगी रुग्णालयात नर्सवर सामूहिक बलात्काराचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली आहे. नर्सने ब्लेडने आरोपीचा प्रायव्हेट पार्ट कापला आणि तिथून स्वताची सुटका करून घेतली. पोलिसांनी या धक्कादायक घटनेची माहिती दिली आहे.
अधिक माहिती अशी की, नर्सवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्यांपैकी एक डॉक्टर आहे. आरोपी डॉक्टर समस्तिपूर जिल्ह्यातल्या मुसरीघरारारी पोलीस स्टेशन हद्दीतील गंगापूर येथील आरबीएस हेल्थ केअर सेंटरचा अॅडमिनिस्ट्रेटर आहे. डॉ. संजय कुमार असं त्याचं नाव आहे. खासगी रुग्णालयातली नर्स तिचं काम संपवत होती. त्या वेळी त्याने व त्याच्या दोन सहकाऱ्यांकडून दारूच्या नशेत नर्सवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. नर्सने हिंमत दाखवून सर्जिकल ब्लेडने डॉक्टरच्या प्रायव्हेट पार्टवर वार केला आणि तिथून पळून गेली. रुग्णालयाबाहेर पळून आल्यावर तिने या घटनेची माहिती पोलिसांना दिली.
पोलीस उपअधीक्षक संजय कुमार पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच पोलिसांची एक टीम रुग्णालयात दाखल झाली. त्यांनी तत्काळ नर्सला सुरक्षा दिली आणि तिघा आरोपींना अटक केली. डॉ. कुमार व्यतिरिक्त दोन आरोपींची नावं अवधेश कुमार आणि सुनील कुमार गुप्ता अशी आहेत. जखमी डॉक्टरवर उपचार सुरू आहेत. ही नर्स मागच्या 10-15 महिन्यांपासून रुग्णालयात काम करत होती. तिने स्वतःच्या बचावासाठी डॉक्टरवर सर्जिकल ब्लेडने हल्ला केल्याचं सांगितलं आहे.
डीएसपी कुमार यांनी सांगितलं की नर्सवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी आरोपींनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे कनेक्शन कापले आणि रुग्णालयाला आतून कुलूप लावले. “नर्सने दाखवलेली हिंमत कौतुकास्पद आहे,” असं डीएसपी म्हणाले.
रुग्णालयात पोलिसांनी तपास केल्यावर नर्सने वापरलेलं सर्जिकल ब्लेड, रक्ताने माखलेले कपडे, दारूची बाटली आणि तीन मोबाइल फोन जप्त करण्यात आले. या घटनेपूर्वी तिन्ही आरोपी दारू प्यायले होते, असं पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. बिहारमध्ये दारूबंदी आहे. त्यामुळे त्यांनी दारू प्यायली असल्याने त्या कलमांतर्गतही गुन्हा दाखल केला जाईल, असंही पोलीस म्हणाले आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.