पुणे : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात शेत जमीन मोजणी, तसेच हद्द निश्चितीसाठी मध्यस्थाच्या मार्फत ३ हजारांची लाच घेणाऱ्या भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. याप्रकरणी भूकरमापक अधिकारी शिवराज यशवंत बंडगर (वय २४), मध्यस्थ अमोल विष्णू कदम (वय २७, रा. सरहदवाडी, ता. शिरूर) यांच्याविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ४३ वर्षीय शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
याबाबत अधिक माहिती अशी कि, तक्रारदार शेतकऱ्याची शेतजमिनीची हद्द कायम करण्याकरिता त्यांनी शिरुर येथील भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज करून त्यासाठी लागणारे शासकीय शुल्क तक्रारदार यांनी भरले होते. भूकरमापक अधिकारी शिरूर तालुक्यातील धामारी येथे आले होते. त्यांच्याबरोबर अमोल कदम होता.
कदमने तक्रारदारांकडे दोन गटाची शेतजमीन मोजणी, तसेच हद्द निश्चित करण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रार दाखल झाल्यानंतर पडताळणी करण्यात आली. त्यानंतर सापळा लावून शेतकऱ्याकडून लाच घेणाऱ्या कदमला पकडले. कदम याच्या मार्फत लाच घेणारे बंडगर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.