योगेश पडवळ
पाबळ, (पुणे) : पाऊस नसल्याने दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. त्यातून पिकवलेल्या मालाला बाजारभाव नाही. या समस्यांना सामोरे जात असताना रोहित्र चोरीच्या घटना घडत असल्याने शेतकऱ्यांपुढे समस्यांचा डोंगर उभा राहिला आहे. शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात रोहित्र चोरीच्या घटना वारंवार घडत असून पोलिसांनी तत्काळ या घटनांचा तपास लावावा. महावितरण ने देखील तत्काळ येथील विज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
सविंदणे ( ता. शिरूर ) येथे रविवर ( ता. १७ ) रात्रीच्या सुमारास अंधाराचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी पुर्वनरवडे मळा व हाडकी हाडवळा येथील असे दोन विद्युत रोहीत्र फोडून त्यातील तांब्याच्या तारा चोरुन नेल्या आहे. वीस दिवसांपुर्वी याच परीसरातील फटांगडे दरा येथील विद्युत रोहित्र फोडले होते.
येथील ग्रामपंचायत गावठाण पाणीपुरवठा व कामठेवाडी, डोंगरभाग पिराचामाळ या ठिकाणी पाणीपुरवठा होणाऱ्या विहिरी आहेत. सदर दोन्ही विहिरींचे विद्युत जोड या रोहित्रावरून आहे. या रोहित्राची चोरी झाल्याने गावठाण व इतर वस्त्यांचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे नागरिकांची पाण्याची अत्यंत गैरसोय होत अआहे. या घटनेची प्रत्यक्ष पाहणी करून गुन्हेगारांचा शोध लावून त्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सरपंच शुभांगी पडवळ यांनी शिरूर पोलिस स्टेशनला लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
दरम्यान, घोडनदी परिसरातील चांडोह ( ता. शिरूर ) येथे पाच ते सहा शेतकऱ्यांच्या विदुयत मोटारींच्या महागड्या केबलची चोरी झाली आहे. एकुणच बेट भागात विदयुत रोहीत्र, केबल, विदयुत मोटार चोरण्याचा धुमाकुळ चोरट्यांनी घातला आहे. रांजणगाव गणपती एमआयडीसी पोलिस स्टेशन अंतर्गत अशा रोहित्र चोरीचा छडा लागला होता. पण यापुढे शिरूर पोलिस स्टेशनपुढे अशा चोरीला आळा बसण्याचे आव्हाण निर्माण झाले आहे.