युनुस तांबोळी
(Shirur News) शिरूर : मोबाईल हा मानवाचा अभिवाज्य भाग बनला आहे. एकदा मोबाईल हरवला की तो पुन्हा परत मिळण्याची आशाच सोडून दिली जाते. एवढ्या प्रचंड लोकसंख्येत पोलीस तरी कसा शोध लावणार या निष्कर्षावर नागरिक येतात. पण तंत्रज्ञान एवढे विकसित झाले की कुठलीही गोष्ट अशक्य नाही. मात्र ही अशक्यता शिरूर पोलिसांनी खोडून काढत चोरी गेलेले ७ मोबाईल नागरिकांना परत केले आहे.
फोनचा शोध घेण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलिसांना सुचना…!
पुणे (ग्रामीण) पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांनी नागरीकांचे गहाळ झालेले मोबाईल फोन कालांतराने कोठे ना कोठे वापरले जातात. यासाठी पोलीस अधिक्षक गोयल यांनी सायबर पोलिसांच्या मदतीने अशा मोबाईल फोनचा शोध घेण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलिसांना सुचना दिल्या होत्या.
त्यानुसार, शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील, महिला पोलीस हवालदार रेखा टोपे, पोलीस अंमलदार प्रवीण पिठले व तांत्रिक विश्लेषक दीपक बढे यांचे एक पथक तयार केले होते.
जिल्ह्यासह शिरूर तालुक्यात गेल्या काही दिवसांत मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या आहेत. चोरीला तसेच हरवलेले मोबाईल शोधणे हे पोलिसांसमोर एक मोठे आवाहन असते. मात्र शिरूर पोलिसांनी तांत्रीक विश्लेषणकरून एकूण किंमत ३ लाख २८ हजार रुपये किंमतीचे २० मोबाईल फोन शोधले व त्यातील मोबाईल रमेश खाडे, संभाजी जामदार, आत्माराम नढे, ओंकार शिंदे, सुनील इसोकार, दादासाहेब बेंद्रे, वैभव दसगुडे आणि रामकृष्ण बिडगर अशा ७ लोकांना परत केले. तसेच उर्वरित १३ मोबाईल देखील मुळ मालकांना परत केले जाणार आहेत. असे शिरूर पोलिसांनी सांगितले आहे.
दरम्यान, मोबाईल परत मिळाल्याने, अनेकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आलं. मोबाईल परत मिळाल्यानंतर लोकांनी पोलिसांचे आभार मानले आहे. तर यासाठी सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक प्रविण खानापुरे, पोलीस अंमलदार सचिन गायकवाड व सुनिल कोळी यांनी तांत्रिक माहीती पुरवुन मोलाचे सहकार्य केले.