अक्षय भोरडे
Shirur News तळेगाव ढमढेरे : पती व सासूच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथे बुधवारी (ता.१२) उघडकीस आली आहे. (Shirur News) याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Shirur News)
श्रद्धा मंजुष भंडारी (वय २२ रा. निमगाव म्हाळुंगी ता. शिरुर जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तर पती मंजुष आयप्पा भंडारी व सासू सुनिता आयप्पा भंडारी (दोघे रा. निमगाव म्हाळुंगी ता. शिरुर जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या मायलेकांची नावे आहेत. याप्रकरणी श्रद्धाचा भाऊ अशोक ईराप्पा भंडारी (वय ३३ रा. पोर्णिमा हाईट मानाजी नगर पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धा यांचा मंजुष भंडारी यांच्याशी विवाह सन २०२१ मध्ये झाला होता. विवाहानंतर श्रद्धाला पती मंजुष व सासू सुनिता हे माहेरहून हुंडा आणला नाही. असे म्हणून नाहक त्रास करु लागले. श्रद्धाने हुंड्यास नकार दिल्यानंतर पती व सासूने तिला मारहाण केली.
श्रद्धाने याबाबत आईवडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी तिच्या पती व सासूला समजावून सांगितले. मात्र तरीही श्रद्धाला वारंवार पैशाची मागणी होत होती. त्यानंतर श्रद्धाचा भाऊ अशोक व आईने अनेकदा मंजुषच्या मित्रांच्या खात्यावर पैसे देखील पाठवले आहेत.
दरम्यान, श्रद्धा बाळंतपणासाठी माहेरी गेली असता तिला मुलगी झाली. त्यामुळे मंजुष याने मुलगी झाल्याने श्रद्धाला नांदावयांस आणले नाही. मात्र सहा महिन्यांनी दोन्ही कुटुंबांनी समजोता करत तिला नांदण्यास आणून सोडले. त्यांनतर देखील श्रद्धाचे पती व सासू तिला वारंवार पैशाची मागणी करत मारहाण करत होते. पती व सासूच्या जाचाला कंटाळून श्रद्धाने १२ जुलै रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली.
याप्रकरणी श्रद्धाचा भाऊ अशोक भंडारी यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानंतर मंजुष भंडारी व सुनिता भंडारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे करीत आहेत.