साहेबराव लोखंडे
Shirur News : टाकळी हाजी : टाकळी हाजी (ता.शिरूर) विद्युत उपकेंद्रातील सविंदणे, कवठे येमाई, निमगाव दुडे, मलठण, रावडेवाडी, आमदाबाद या गावांतील महिनाभरात तब्बल १५ विद्युत रोहित्रांची चोरी झाली आहे. चोरट्यांनी विद्युत रोहीत्र चोरीवर चांगलाच सपाटा लावला आहे. शुक्रवारी (दि. १३) रोजी पहाटे रावडेवाडी येथील विद्युत रोहीत्र चोरी गेले आहे.
गावचा, शेतीचा पाणीपुरवठा ठप्प
विद्युत रोहित्र फोडून त्यातील तांब्याच्या महागड्या कॉईल्स काढून त्याची विक्री होत आहे. कमी कष्टात जास्त पैसा मिळत असल्याने चोर विद्युत रोहीत्र चोरीकडे वळाले आहे. विद्युत रोहीत्र चोरीला जात असल्यामुळे गावचा, शेतीचा पाणीपुरवठा ठप्प होत आहे. निर्मनुष्य असणाऱ्या ठिकाणचे विद्युत रोहीत्र हेरुन ते चोरी करण्याचे काम चोर करत असल्याचे शिरुरचे विद्युत उपकार्यकारी अभियंता सुमित जाधव, टाकळी हाजी उपकेंद्राचे सहाय्यक अभियंता राजेंद्र इंगळे यांनी सांगितले.
दरम्यान, टाकळी हाजी औटपोस्टच्या वतीने रात्रगस्त घालण्याचे काम सुरू असून, नागरीकांनी, ग्रामसुरक्षा दलाने सतर्क राहावे. संशयास्पद हालचाली वाटल्यास संपर्क करण्याचे आवाहन शिरूर पोलिस स्टेशनकडून करण्यात आले आहे. या विद्युत रोहित्र चोरांचा छडा लावण्याची मागणी बेट भागातून जोर धरू लागली आहे.