(Shirur Crime )तळेगाव ढमढेरे, (पुणे) : तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायत हद्दीतील कासारी फाटा रस्त्यावरून निघालेल्या दुचाकीवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. मंगळवारी (ता. ११) रात्री १० वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. या हल्ल्यात दुचाकीस्वाराची पत्नी व मुलगा किरकोळ जखमी झाले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नवनाथ नरके पत्नी उर्मिला नरके, मुलगा विराज (रा. सर्वजन तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर) अशी दुचाकीवरून निघालेल्या तिघांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार…!
तळेगाव ढमढेरे येथील नवनाथ नरके हे पत्नी ऊर्मिला व मुलगा विराज यांच्यासह दुचाकीवरून नातेवाइकांकडे गेले होते. मंगळवारी संध्याकाळी दहा वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून कासारी फाटा मार्गे घरी येत असताना अंधारात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक दुचाकीच्या दिशेने झडप मारली.
दरम्यान, बिबट्या झडप मारत असल्याचे लक्षात येताच नवनाथ यांनी दुचाकीचा वेग वाढविल्यामुळे पत्नी व मुलाच्या पायावर बिबट्याचा पंजा लागला. यामध्ये दोघे किरकोळ जखमी झाले. परिसरात बिबट्याची पाहणी करून वरिष्ठ अधिकार्यांच्या आदेशानुसार निर्णय घेतला जाईल, असे नियतक्षेत्र अधिकारी प्रमोद पाटील यांनी सांगितले.