पुणे : पुणे शहरात शुक्रवारी मध्यरात्रीपासून एका अफवेमुळे तणाव निर्माण झाला आहे. दर्ग्यावर कारवाई होणार, दर्गा पाडणार अशी अफवा पसरल्याने शेख सलाउद्दीन दर्गा परिसरात कालरात्री जमाव जमला होता. त्यानंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच पोलिसांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत.
पुण्यातील कसबा पेठेत असणाऱ्या सलाउद्दीन दर्ग्याच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई होणार असल्याची अफवा पसरल्यामुळे शहरात तणाव निर्माण झाला आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कोणत्या ही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन केले आहे. तसेच अफवा पसरवणाऱ्याचा शोध सुरु केला आहे. असंही त्यांनी स्पष्ट केलं.
नेमकं प्रकरण काय?
पुणे शहरातील कसबा पेठेतील शेख सल्लाह दर्गा परिसरात अनधिकृत असणाऱ्या अतिक्रमणावर करवाई होणार असल्याची अफवा शुक्रवारी मध्यरात्री पसरली. त्यानंतर या ठिकाणी मोठ्या संख्येने मुस्लीम समाज जमा झाला. अफवेनंतर काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी बंदोबस्त वाढवून परिस्थिती सामान्य केली. अखेर पोलीस आयुक्तांच्या आश्वासनानंतर तणाव निवळला असून परिसरात शांतता निर्माण झाली आहे. काही लोक अफवा पसरवून भडकवण्याच काम करत आहेत. अशी लोक आमच्या रडारवर आहेत, असं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं.
पुणे पोलीस दलातील सर्व पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या सुट्या रद्द
पुण्यातील तणावामुळे पुणे पोलीस दलातील सर्व पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हे आदेश काढले आहेत. आज आणि उद्या सर्व पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर या सगळ्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.