पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांना धमकी देणारा तसेच ससुन हॉस्पिटलमधून पळून जाणाऱ्या मार्शल लुईस लीलाकर याला सायबर पोलिसांनी आज पहाटे पावणे दोन वाजण्याच्या सुमारास अटक केली आहे. लीलाकरला येरवडा येथील त्याच्या मावशीच्या घरातून अटक करण्यात आली आहे.
कुख्यात गुंड शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांना सोशल मीडियावर रीलद्वारे धमकी दिल्याप्रकरणी लीलाकरला अटक करण्यात आली होती. लीलाकर ११ फेब्रुवारी रोजी सकाळी सायबर पोलिसांच्या ताब्यातून ससून रुग्णालयातून पसार झाला होता. लीलाकरने त्याला सकाळी छातीत दुखत असल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती. त्यामुळे त्याला वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात घेऊन आले होते. त्यावेळी त्यांची नजर चुकवून लीलाकर पसार झाला होता. आरोपींचा शोध घेण्यासाठी सायबर आणि गुन्हे शाखेचे पोलिस पथक नेरळ आणि कर्जत येथे रवाना करण्यात आली होती.
दरम्यान, आज तो येरवडा येथील मावशीच्या घरी भेटायला आल्याची माहिती सायबर पोलिसांना मिळाली. यावेळी त्या ठिकाणी तैनात असलेल्या सायबर पोलिसांच्या पथकाने त्याला अटक केली आहे. त्याच्यावर बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये रजिस्टर नंबर 44 /2024 कलम 224 भादवि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यामुळे आरोपी लीलाकरला बंडगार्डन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.