नाशिक: भारतीय रेल्वेतील तिकीट तपासनीस (टीसी) पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवत एका मामाने आपल्या भाच्याची तब्बल १४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. नाशिकमधील आडगाव पोलिस ठाण्यात या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, फिर्यादी उज्वल सुभाष गोसावी (वय ४०, रा. वृंदावननगर, आडगाव) यांनी यासंदर्भात पोलिसात तक्रार दिली आहे. या फसवणुकीप्रकरणी नीलकंठ गोसावी, प्रिया गोसावी आणि महेश गोसावी (सर्व रा. कैलास कुंज, कोपरखैरणे, ठाणे) अशी संशयितांची नावे आहेत. विशेष म्हणजे फिर्यादी आणि संशयित यांच्यात मामा-भाच्याचे नाते आहे.

फिर्यादी उज्वल यांना भारतीय रेल्वेतील टीसी पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवत २४ मार्च २०२२ रोजी ठाण्यात १४ लाख रुपये घेण्यात आले. काही दिवसांनी त्यांना बनावट नियुक्ती पत्र देण्यात आले आणि प्रयागराज येथे प्रशिक्षणासाठी बोलावण्यात आले. मात्र तेथे गेल्यावर कोणतेही प्रशिक्षण नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना फसवणुकीचा अंदाज आला. त्यांनी या प्रकरणी संशयितांकडे पैसे परत मागितले. मध्यस्थी करत महेश गोसावी यांच्या मार्फत पुन्हा नीलकंठ व प्रिया गोसावी यांच्याशी संपर्क साधण्यात आला.
नोव्हेंबर २०२२ मध्ये संशयितांनी एक महिन्याची मुदत मागून घेतली आणि सात-सात लाखांचे दोन धनादेश उज्वल यांना दिले. मात्र हे धनादेश बँकेत भरल्यानंतर बाऊन्स झाले. त्या वेळी विचारणा केली असता संशयितांनी पैसे जमवण्याचे कारण सांगत वेळ काढली. अखेर सातत्याने टाळाटाळ होत असल्याचे लक्षात आल्यावर उज्वल यांनी आडगाव पोलीस ठाण्यात तिघांविरोधात फसवणुकीची अधिकृत तक्रार नोंदवली. या प्रकारामुळे नात्यातील विश्वासाचे बळी गेल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.








