पुणे : शिक्षकाच्या सेवापुस्तकावर सहाव्या व सातव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चितीची पडताळणी करून देण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पुणे शिक्षण विभागाचे वरिष्ठ व कनिष्ठ लेखाधिकारी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (ता.२०) रंगेहाथ पकडले.
प्रमिला प्रभाकरराव गिरी (वय-३८, वरिष्ठ लेखाधिकारी, वर्ग २, कार्यालय शिक्षण विभाग, पुणे) आणि अनिल श्रीधर लोडे (वय ५७, कनिष्ठ लेखाधिकारी, शिक्षण विभाग, पुणे) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. याप्रकरणी एका ४३ वर्षीय शिक्षकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे एक शिक्षक असून, त्यांच्या सेवापुस्तकावर सहाव्या व सातव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चितीची पडताळणी करून देण्यासाठी आरोपी प्रमिला गिरी लाच मागितली होती. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
सदर तक्रारीची पडताळणी केली असता, आरोपी प्रमिला गिरी यांनी तक्रारदार यांच्याकडे ६ हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यातील ५ हजार रुपयांची लाच तक्रारदार यांच्याकडून स्वीकारताना आरोपी लोकसेवक अनिल लोंढे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आरोपी प्रमिला गिरी व आरोपी अनिल लोंढे यांना ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु आहे. पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक विजयमाला पवार करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त/ पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
दरम्यान, शासकीय अधिकारी, कर्मचारी / लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास ०२० – २६१२२१३४, २६१३२८०२, २६०५०४२३ या दूरध्वनी क्रमांकवर संपर्क साधावा, असे आवाहन पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी केले आहे.