पुणे : भिगवण (ता. इंदापूर) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील एका विद्यार्थीनीवर शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच आता, लाखनगाव (ता.आंबेगाव) येथील जिल्हा परिषद शाळेतील सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर वर्गशिक्षकाने विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मंचर पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.
बाबाजी उमाजी घोडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पारगावचे केंद्रप्रमुख कांताराम गोंडवे यांनी मंचर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बाबाजी घोडे हे लाखनगाव (ता.आंबेगाव) येथील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता सातवीच्या वर्गाचे वर्गशिक्षक आहेत. आरोपी हा आपल्यासोबत संबंधित गैरप्रकार करत असल्याचे मुलीने आपल्या पालकांना सांगितले. त्यानंतर सर्वत्र ही घटना पसरल्यानंतर मुलीचे पालक आणि ग्रामस्थ मुख्याध्यापकांना भेटले. त्यानंतर मुख्याध्यापकांनी ही माहिती केंद्रप्रमुख कांताराम गोंडवे आणि गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांना दिली.
त्यानंतर केंद्रप्रमुख कांताराम गोंडवे यांनी याप्रकरणी आरोपी बाबाजी घोडे यांच्याविरोधात मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीवर पोक्सो कलम ८ आणि १२ अंतर्गत दाखल करून आरोपीला तत्काळ बेड्या ठोकल्या आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक खाटे करीत आहेत.
दरम्यान, या संपूर्ण घटनेचा तपास करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच यामध्ये संबंधित मुलीचे स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आले. त्यानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.