Satara News सातारा : “लवकरच या फोटोला हार चढणार आहे, शब्द आहे आपला. खूप केलं माणसांसाठी आता बस्स, नाय जमणार पुढे आयुष्य काढायला आणि नाय या फोटोला हार चढला तर मला….. बंटी करपे आपणास भावपूर्ण श्रद्धांजली” असे व्हाट्सअॅप स्टेटस ठेवत तरुणाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. (Satara News) सातारा जिल्ह्यातील करपेवाडी (ता.पाटण) येथे काल शुक्रवार (दि.23) रोजी हा प्रकार घडला. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. या तरुणाने हे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप समजू शकलेले नाही. (Satara News)
सातारा पोलीस ठाण्यात नोंद
स्वप्नील उर्फ बंटी दिनेश करपे (वय 22) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात नोंद करून घेण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन महिन्यांपूर्वी स्वप्नीलचे लग्न झाले होते. काही दिवसांपूर्वीच त्याची पत्नी माहेरी मुंबई गेली आहे. तो एका खासगी वाहनांवर चालक म्हणून काम करत होता. घरी आई व स्वप्नील असे दोघेच होते. स्वप्नीलने खोलीत झोपायला गेल्यावर मोबाईलवर स्वतःचा फोटो तसेच त्यावर भावपूर्ण श्रद्धांजली व इतर मजकूर लिहिलेला स्टेटस ठेवला आणि आपल्या आयुष्याचा शेवट केला.
दरम्यान, त्याचे हे स्टेट्स पाहून काही जणांनी त्याच्या घराकडे धाव घेतली. मात्र खोलीचा दरवाजा बंद असल्याने व आतून हाकेला प्रतिसाद मिळत नसल्याने लोकांनी खिडकीतून खात्री केल्यावर त्याने गळफास घेवून आत्महत्या केली असल्याचे समोर आले. पुढील तपास पोलीस करत आहेत.