Satara Breaking News : सातारा : सोशल सोशल मीडियायावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी साताऱ्यातील खटाव तालुक्यातील पुसेसावळी गावात दोन गटांत दगडफेक आणि जाळपोळ झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून, तिघे जखमी झाले आहेत. रविवारी (ता. १०) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे पुसेसावळी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
रविवारी रात्री दोन गटात संघर्ष
पुसेसावळी येथील एका माध्यम समूहावर महापुरुषांबाबत आक्षेपार्ह मजकूर प्रसारित झाला होता. हा मजकूर एका विशिष्ट समुदायातील युवक प्रसारित करत असल्याच्या संशयावरून रात्री साडेनऊच्या सुमारास या समाजातील बहुसंख्य युवक पुसेसावळी बाजारात जमा झाले. (Satara Breaking News ) या युवकांनी विशिष्ट समाजाची घरे, दुकाने, हातगाड्या, वाहनांना लक्ष्य करत दगडफेक सुरू केली. याच दरम्यान हिंस्त्र जमावाने घरे, दुकानांना आग लावण्यास सुरुवात केली. २ ते ३ हजार युवकांचा जमाव आक्रमकपणे जाळपोळ करत पुढे सरकत होता.
संबंधित घटनेची माहिती मिळाल्यानंतर सातारा पोलीस मुख्यालयातून मोठा पोलीस फौजफाटा पुसेसावळी गावाकडे पाठवण्यात आला आहे. (Satara Breaking News ) त्याचबरोबर सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांतून देखील जास्तीचा बंदोबस्त पुसेसावळी गाव परिसरात तैनात करण्यात आला आहे. घटनास्थळास रात्री कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी भेट दिली आहे.
पोलीस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक बापू बांगर व वरिष्ठ पोलीस आधिकारी पुसेसावळी परिसरात तळ ठोकून आहेत. या घटनेनंतर कोणत्याही अफवा पसरू नयेत यासाठी पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील इंटरनेट सेवा बंद केली आहे. (Satara Breaking News ) पोलिसांनी सर्व नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे. इतर कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे तसेच अशा प्रकारच्या अफवा कोणी पसरवत असल्याचे निदर्शनास आल्यास याबाबतची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन केले आहे.
अनुचित प्रकार घडल्यास प्रशासनाशी संपर्क साधा : सातारा पोलिसांचे आवाहन
पुसेसावळी येथे एका व्यक्तीने सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. या पोस्टवरुन लोकांचा गैरसमज होवून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. सातारा पोलिसांनी संबंधित ठिकाणाला तत्काळ भेट देवून परिस्थिती आटोक्यात आणली आहे. सध्या पुसेसावळी व परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची पूर्ण खबरदारी घेतलेली आहे. तसेच याठिकाणी आवश्यक त्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. या घटनेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच सोशल मिडीयाद्वारे समाजात तेढ निर्माण होणारे संदेश प्रसारित करुन नयेत, जेणेकरुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दक्ष राहून, काही अनुचित प्रकार आढळून आल्यास तत्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन सातारा पोलीस अधीक्षकांनी केले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Breaking News : मणिपूरमध्ये पुन्हा उसळला हिंसाचार; 9 जणांचा मृत्यू; 10 जखमी