सासवड : पुरंदर, भोर, वेल्हे, परिसरातून शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर, ट्रॉली व पाण्याचे टॅंकर चोरणाऱ्या दोघांना सासवड पोलिसांनी गजाआड केले आहे.
गणेश दत्तात्रय मुजुमले (रा.कोंढणपुर, ता. हवेली), व अविनाश तानाजी चोरघे, (रा. राठवडे, ता. हवेली) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी १ ट्रॅक्टर, ३ ट्रॅक्टर ट्रॉली व २ पाण्याचे टॅंकर असा ८ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या कारवाईमुळे तीन तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणी ४ गुन्हे केल्याची कबुली चोरट्यानी दिली आहे.
सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांबळी (ता. पुरंदर) ग्रामपंचायत हद्दीत मंदीराचे काम होते. काम सुरु असल्याने सदर ठिकाणी पाणी भरून ठेवलेला पाण्याचा टॅंकर अज्ञात चोरटयाने चोरूने नेल्याबाबत सासवड पोलीस ठाण्यात दिलीप रामनाथ शेंडकर, रा. चांबळी, (ता. पुरंदर) यांनी फिर्याद दिली होती.
सदर गुन्ह्याचा तपास सुरु असताना पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक गणेश पोटे, जब्बार सय्यद यांनी गुन्हा घडलेपासुन सासवड, कोंढवा, कापुरहोळ, मरीआईघाट असे वेगवेगळया मार्गाचे सी.सी.टी.व्हि पाहुन तपास करत होते. तपासादरम्यान एका खबऱ्याकडून माहिती मिळाली की, कोंढणपुर, राठवडे ता. हवेली गावातील दोन व्यक्ती हे मागील तीन ते चार महिन्यापासुन वेगवेगळया ट्रॅक्टर व ट्रॅक्टर ट्रॉली, पाण्याचे टॅंकर आणत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश मुजुमले व अविनाश चोरघे या दोघांना ताब्यात घेवुन सासवड पोलीस ठाण्यात आणून त्यांचेकडे गुन्हयातील मालाबाबत चौकशी केली असता सुरूवातीला त्यांनी टाळाटाळ केली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी भिवरी, तांभाड, (ता. भोर), अस्कवडी, (ता. वेल्हे) येथून प्रत्येकी १ ट्रॅक्टर ट्रॉली, तर सुरवड (ता. वेल्हे) येथून पाण्याचा टॅंकर चोरी करून कलर बदलुन विक्रि करण्यासाठी तन्वी ट्रॅक्टर्स व फॅब्रिकेशन वर्क नावाने बिलबुक व शिक्के बनवलेचे सांगितले. त्यांच्याकडून पोलिसांनी १ ट्रॅक्टर, ३ ट्रॅक्टर ट्रॉली व २ पाण्याचे टॅंकर असा ८ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.