सासवड, (पुणे) : मजूर महिलांना कामाला घेवुन जातो असे म्हणून मोटार सायकलवर बसवुन निर्जन स्थळी घेऊन जाऊन चाकूच्या धाकाने त्यांच्या अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने लुटणाऱ्या दोन आरोपींना सासवड पोलिसांनी जेरबंद केले आहे. तर एकजण पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.
सुयश उर्फ मोन्या अरूण चिंचकर, (वय २३, रा. भाजीमंड, सासवड, ता. पुरंदर), लक्ष्मण रामभाउ चव्हाण (वय ३०, रा. ता. भोर, मुळ रा. डोगंरताळा, ता. जिंतुर, जि. परभणी) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. तर गणेश उर्फ लहु रामभाउ चव्हाण, रा. लोणीकंद, ता. हवेली) मुळ रा. डोगंरताळा, ता. जिंतुर, जि. परभणी असे फरार आरोपीचे नाव आहे. त्याचा पोलीस शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी (ता. ०५) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास रेखा आनंद कुंडल व सुनिता उमेश जाधव, रा. साठेनगर, सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे. या पी.एम. टी. बस स्टॉपजवळ नाक्यावर मजुरी काम करण्यासाठी उभ्या होत्या. त्यावेळी एक अनोळखी व्यक्ती मोटार सायकलवर येवुन सोनोरी गावात पोलच्या खडयात सिमेंट भरायचे आहे. तुम्हाला प्रत्येकी चारशे रुपये मजुरी देतो असे बोलून फिर्यादी व साक्षिदार यांना मोटार सायकलवर बसवुन सोनोरी गावात डोंगराचे बाजुला घेऊन नेले.
कामाच्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी अगोदरच दोन व्यक्ती उपस्थित होत्या. यावेळी फिर्यादी यांनी त्या व्यक्तीला “आम्हाला जेवायचे आहे पाणी घेवुन या” असे म्हणताच एका व्यक्तीने फिर्यादीला व साक्षीदार यांना चाकूचा धाक दाखवला व गळ्यातील सोन्याचे व चांदीचे असा ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल काढून घेतला. यावेळी तिघेजणहि दुचाकीवर पळून गेले. याबाबत सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर घटनेचा पोलीस तपास करीत असताना पोलीस उप निरीक्षक श्रीराम पालवे, पोलीस नाईक जब्बार सय्यद, गणेश पोटे, निलेश जाधव यांनी गुन्हयाचे अनुशंगाने सासवड, जेजुरी नाका, सेनोरी रोड असे वेगवेगळया परीसरातील सी.सी.टी.व्हि पाहुन तसेच गोपनीय बातमी काढुन सदरचा गुन्हा सुयश उर्फ मोन्या चिंचकर व त्याचे साथिदार यांनी केला असल्याचे समजले.
दरम्यान, गुरुवारी (ता. १७) सुयश उर्फ मोन्या चिंचकर व लक्ष्मण चव्हाण यांना ताब्यात घेवुन चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली पोलिसांना दिली. त्यांच्याकडून पोलिसांनी चोरीचा २७ हजार रुपयांचा मुदेमाल जप्त केला आहे.
सदरची कामगिरी सासवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष जाधव, पोलीस उप निरीक्षक श्रीराम पालवे, पोलीस नाईक गणेश पोटे, जब्बार सय्यद, निलेश जाधव, नवनाथ नानवर, रमेश कर्चे, विकास ओमासे यांचे पथकाने केलेली आहे.