पुणे : दूध व्यवसायातल्या आर्थिक वादातून एका मित्राने आपल्या जिवलग मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली. ही घटना सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातल्या अहिरवाडी येथे घडली आहे. आरोपी मित्राला इस्लामपूर पोलिसांनी अटक केली आहे.
शरद दुटाळे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सुरज बाळासाहेब सावंत (वय. २५) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, वाळवा तालुक्यातल्या अहिरवाडी या ठिकाणी सुरज सावंत आणि आरोपी शरद दुटाळे हे दोघे मित्र राहत होते. या दोघांनी काही वर्षांपूर्वी एकत्रित दुधाचा व्यवसाय सुरू केला होता. हा व्यवसाय सुरु झाल्यानंतर दोघांमध्ये आर्थिक गोष्टीतून वाद सुरू झाले.
त्यातून मग दोघांनीही स्वतंत्र दूध व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला व दोघांनीही गावात दुधाचा स्वतंत्र व्यवसाय सुरु केला. ज्यामध्ये सुरज सावंत यांचा दुधाच्या व्यवसायामध्ये चांगला जम बसला आणि त्याची प्रगती ही चांगल्या प्रमाणात झाली.
तसेच आरोपी शरद दुटाळे याला दूध व्यवसायामध्ये जम बसवता आला नाही आणि त्याचा व्यवसाय डबघाईला आला. त्यामुळे त्याने आपला दुधाचा व्यवसाय बंद केला. मात्र आपल्या मित्राचा व्यवसाय सुरूच आहे याचा राग शरद याच्या मनात खदखदत होता.
या रागातून गुरुवारी (ता.१६ ) रात्रीच्या सुमारास शरद याने आपला जीवलग मित्र सुरज याच्या डोक्यात लोखंडी रॉड टाकून त्याची हत्या केली.
या घटनेची माहिती मिळताच इस्लामपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्याचा पंचनामा केला. यानंतर आरोपी शरद दुटाळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.