अयनुद्दीन सोलंकी
घाटंजी (यवतमाळ) : घाटंजी तालुक्यातील पारवा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील खडका (तांडा) येथे रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत ५ हजार किमतीची १ ब्रास रेती व ६ लाख रुपयांचे ट्रॅक्टर, ट्राली असा एकूण ६ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. २३) करण्यात आली.
या प्रकरणी पोलिस हवालदार सतिश इंगळे (वय-३३, पोलिस स्टेशन, पारवा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून संशयीत आरोपी प्रविण लक्ष्मण टेकाम (वय-२७, रा. चिखलवर्धा, ता. घाटंजी), प्रविण प्रकाश मुंजेवार (वय-३८, रा. ताडसावळी, ता. घाटंजी) यांचे विरुद्ध पारवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी टेकाम आणि मुंजेवार यांनी स्वतः जवळ रेती वाहतूकीचा कोणताही परवाना नाही. असं असतानाही आरोपींनी अवैधरित्या रेती चोरुन चालवली होती. रेती घेऊन जात असताना ठाणेदार संदीप नरसाळे यांनी खडका (तांडा) येथे आरोपींचा ट्रॅक्टर पकडला.
वाहनाचे कागदपत्रे व रेती वाहतूकीचा परवाना या बाबत आरोपींना विचारणा केली असता, त्यांचेकडे रेती वाहतूकीचा परवाना आढळला नाही. पारवा पोलिस स्टेशनचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप नरसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार अविनाश मुंडे हे सदर प्रकरणाचा पुढील तपास करीत आहे.