Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वर्गात कोठे बसायचे, या कारणावरुन शाळकरी मुलांमध्ये झालेल्या भांडणातून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. शहरापासून जवळच असलेल्या दौलताबाद येथे हा प्रकार घडला आहे.
चार अल्पवयीन विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा दाखल
याप्रकरणी मृत विद्यार्थ्याच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरुन चार अल्पवयीन विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाळेच्या मधल्या सुटीत मैदानावर चार वर्गमित्रांनी केलेल्या मारहाणीत कार्तिक मनोहर गायकवाड या अकरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात तपास दौलताबाद पोलीस करत आहेत. घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, दौलताबाद येथील देवगिरी विद्यालयातील सहावीच्या वर्गात कार्तिक मनोहर गायकवाड त्याच्या बहिणीसोबत शिक्षण घेत होता. शाळेतील वर्गखोलीत बाकावर बसण्यावरुन त्याचा एका वर्गमित्राशी वाद झाला. (Sambhajinagar News) त्यानंतर मधल्या सुट्टीत शाळेच्या मैदानावर कार्तिक खेळत असताना त्याचा वर्गमित्र आणि वर्गातील इतर तीन विद्यार्थ्यांनी कार्तिकला गाठून बेदम मारहाण केली आणि चौघेही निघून गेले.
दरम्यान, ६ जुलैला मारहाणीनंतर कार्तिक पोटात दुखत असल्याची तक्रार सतत करत होता. त्यादिवसापासून याच कारणास्तव तो शाळेत जात नव्हता. अधिक त्रास होत असल्याने वडिलांनी त्याला खासगी दवाखान्यात दाखवले. परंतु, उपचारानंतर देखील गुण आला नाही. पुन्हा पुढील उपचारांसाठी कन्नड येथील खासगी दवाखान्यात नेण्यात आले. (Sambhajinagar News) तेथे डॉक्टरांनी दुसऱ्या मोठ्या दवाखान्यात उपचारासाठी घेऊन जाण्याचा सल्ला दिला. दुसऱ्या दिवशी पालकांनी त्याला घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान कार्तिकचा १४ जुलै रोजी सायंकाळी मृत्यू झाला.
दरम्यान कार्तिकचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. या अहवालात पोटाला जबर मार लागल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. यावरून कार्तिकचे वडील मनोहर गायकवाड यांनी बुधवारी दौलताबाद पोलिसांत फिर्याद दिली. (Sambhajinagar News) वडिलांच्या तक्रारीवरून दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. कार्तिकच्या मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली आहे.