छत्रपती संभाजीनगर : सिल्लोड-पाचोरा महामार्गावरील वांगी फाट्याजवळ गॅस सिलेंडर घेऊन जाणाऱ्या टेम्पो आणि एसटी बसमध्ये भीषण अपघात (Sambhajinagar Accident) झाला असून यात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातातील १० जणांची प्रकृती गंभीर असून ३० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी (ता ०३) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सिल्लोड (Sillod)ते पाचोरा महामार्गावरील वांगी फाट्याजवळ एसटी बस आणि टेम्पोमध्ये भीषण अपघात(Sambhajinagar Accident) झाला. यावेळी बसमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करत होते. हा अपघात एवढा भीषण होता की एसटी बसच्या समोरील भागाचा अक्षरशः चुराडा झाला आहे. तर अपघातातील टेम्पोची ओळख देखील पटत नाही.
या अपघातानंतर टेम्पो मधील सिलेंडर रस्त्यावर सांडले होते. तर दोन्ही वाहनांचा समोरील भागाचा चुराडा झाला आहे. परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच रस्त्याने जाणाऱ्या वाहनधारक देखील अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून आले. एसटी बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना नागरिकांनी बाहेर काढले.
दरम्यान, प्रवाशांनी रुग्णवाहिका बोलावून जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. यासंदर्भात पोलिसांना देखील माहिती मिळताच ते घटनास्थळी पोचले व जखमींना मदत करताना वाहतूक देखील सुरळीत केली.