Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगर : डोकेदुखी हे नेहमी आढळणारे लक्षण आहे. बऱ्याच वेळा डोकेदुखीमागे निश्चित ठोस आजार नसतो. मानसिक ताण, भूक, उपासमार, गोंगाट, वातावरणातील बदल, अपचन, बद्धकोष्ठ इत्यादी कारणांमुळेही डोकेदुखी होत असते. यामुळे डोकेदुखी एक ‘किरकोळ’ तक्रार समजली जाते. अशी डोकेदुखी ते कारण शमले, की आपोआप दूर होते. त्यामुळे त्याकडे फार कोणी लक्ष देत नाही. मात्र, ही डोकेदुखी हेच मृत्यूचेही कारण बनू शकते, हे नुकतेच उघडकीला आले आहे. छत्रपती संभाजीनगरमधील एका तरुणीने केवळ डोकेदुखीमुळे टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली आहे.
हर्सूल सावंगी परिसरातील घटना
शहरातील एका विद्यालयात फुड टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असलेल्या तरुणीने डोकेदुखी असह्य झाल्यामुळे सिलिंग फॅनला ओढणीने गळफास घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. (Sambhaji Nagar) आत्महत्या केल्याची ही घटना शहरातील हर्सूल सावंगी परिसरात घडली आहे. प्रिया रमेश बुजडे असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, गेल्या २० दिवसांपासून प्रियाचे डोके दुखत होते. डोकेदुखीचा हा त्रास सहनशक्तीच्या पलीकडे केल्यामुळे प्रियाने हे पाऊल उचलले आहे. (Sambhaji Nagar) आत्महत्येपूर्वी प्रियाने एक चिठ्ठी लिहिली आहे. या चिठ्ठीत तिने आपल्या आई-वडिलांची माफी मागत आत्महत्येचे कारणही सांगितले आहे.
मम्मी, पप्पा सॉरी, मला डोकेदुखी असह्य झाल्याने मी आत्महत्या करत आहे, असे या तरुणीने चिठ्ठीत लिहिले होते. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.