पुणे : लॉटरी लागल्याचे आमिष दाखवून महिलांच्या गळ्यातील दागिने लुटून सराईत चोरट्याने पुण्यात धुमाकूळ घातला होता. मात्र, त्याला अपवाद ठरल्या निंबाजीनगर येथील ७० वर्षीय हुशार व धाडसी आजी..!! या आजीच्या साहसामुळे महिलांच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या एका सराईत चोरट्याला पकडण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.
साजीद अहमद शेख (रा. फातिमानगर, औरंगाबाद) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी निंबाजीनगर येथे राहणार्या एका ७० वर्षाच्या महिलेने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
ही घटना सनसिटी रोडवरील सन एम्पायर सोसायटीमधील कात्रज मिल्क पार्लरमध्ये शुक्रवारी (ता.६) सकाळी नऊ ते पावणे दहा वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या एका महिलेबरोबर सकाळी वॉकिंग करुन सन ऑरबीट सोसायटीच्या गेटजवळ शुक्रवारी (ता.६) सकाळी बसल्या होत्या. त्यावेळी तेथे एक जण बुलेटवरुन आला. म्हणाला मी तुमच्या मुलाला ओळखतो. त्याला अडीच लाखांची लॉटरी लागली आहे. आमचे साहेब जवळच थांबले आहेत. तुम्हाला लॉटरीचे पैसे घेऊन देतो, असे सांगितले.
त्यानंतर आरोपी आजीला घेऊन सन एम्पायर सोसायटीमधील कात्रज मिल्क पार्लर दुकानाच्या मोकळ्या जागेत घेऊन आला. तेथे आजींना खुर्ची आणून त्यावर बसण्यास सांगितले. तेव्हा या आजींना शंका आली. त्यांनी आपल्या नातेवाईकांना फोन करुन हा प्रकार सांगितले. त्यांनी तातडीने पोलिसांना ही बाब सांगितली.
दरम्यान, या घटनेची माहिती म्मिलातच सिंहगड रोड पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपी साजीद अहमद शेख अटक केली आहे. मात्र पोलीस पोहोचण्याच्या आगोदरच नागरिकांनी आरोपीला चांगलाच चोप दिल्याने तो जखमी झाला आहे.