पुणे : जळगावमधील एका जन्मदात्याने पोटच्या ६ दिवसाच्या मुलीची कर्वेनगर (पुणे) परिसरातील संभाजीनगर येथे राहणाऱ्या एका तृतीयपंथीला विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी निर्दयी बाप व तृतीयपंथीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे बाळ २१ ऑक्टोबर २०२१ ते २३ सप्टेंबर २०२२ पर्यंत तृतीयपंथींजवळ होते.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव येथील एकाला पहिल्या दोन मुली असताना, पुन्हा तिसरीच मुलगी झाली. परत मुलगीच झाल्याने, त्याने कर्वेनगर येथील तृतीयपंथीला ६ दिवसाच्या मुलीची विक्री केली. तर कर्वेनगर येथील संभाजीनगर येथे राहणाऱ्या दोन तृतीयपंथींनी स्वतःच्या फायद्यासाठी या मुलीला विकत घेतले.
निर्दयी बाप व तृतीयपंथीजवळ दत्तक घेण्यासाठी लागणारी कोणतीही कागदपत्रे केली नव्हती. तसेच दत्तक कायद्याच्या तरतुदीशिवाय केवळ मुलगी नको म्हणून या बालिकेला बापाने विकण्याचा निर्णय घेतला. आणि हे बाळ २१ ऑक्टोबर २०२१ ते २३ सप्टेंबर २०२२ पर्यंत तृतीयपंथींजवळ होते.
पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी बाळाला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी जिल्हा बालकल्याण समितीच्या अध्यक्षा डॉ. राणी खेडीकर यांच्याशी संपर्क साधून त्यांना या मुलीबाबत माहिती दिली. तर गुन्हे शाखेने निर्दयी बापावर व खरेदी करणाऱ्यावर बालन्याय अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, बालकल्याण समितीच्या सदस्या वैशाली गायकवाड, श्यामलता राव, पूर्वी जाधव, आनंद शिंदे यांच्याशी चर्चा करून या मुलीला सध्या एका संस्थेत तात्पुरते दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.