पुणे : घरावर करणी केल्याच्या संशयावरून व आपल्या आईला भेटू न देण्याच्या रागातून सख्ख्या दिराने आपल्या भावजयीचा गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील चंदननगर परिसरात घडली आहे.
लक्ष्मीबाई श्रीराम (वय -५४ रा. बिडी कामगार वसाहत, चंदननगर, हवेली) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तर श्रीनिवास श्रीराम (रा. बिडीकामगार वसाहत) असे खून केलेल्या दिराचे नाव असून चंदननगर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या प्रकरणी सागर रमेश दासा (वय-३९ रा. वडगाव शेरी) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि मयत यांच्यात दीर-भावजयीच नातं होतं. हे अगोदर बिडी कामगार वसाहतीत राहत होते, नंतर किरकोळ वादानंतर ते वेगळे राहायला लागले. आई तुळजा भवानीची परडी घेऊन ही महिला जोगवा मागत होती. वडगावशेरी येथे एका ठिकाणी परडी भरण्याचा कार्यक्रम होता. म्हणून या महिलेला बोलावून घेण्यात आलं. त्या ठिकाणी लक्ष्मीबाई गेल्या असता तिथे आरोपी श्रीनिवास देखील आला. त्याने कार्यक्रम असलेल्या घरच्या लोकांना बाकीचे सामान आणण्यासाठी तुम्ही बाहेर जा, असे सांगितले.
दरम्यान, त्यानंतर श्रीनिवास याने लक्ष्मीबाई यांचा गळा चिरून खून केला. त्या खोलीमध्ये दोघेच होते, दुसरे कोणीही नव्हते, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र लोखंडे यांच्या नेतृत्वात पोलिसांनी आरोपीचे लोकेशन ट्रॅक करत घटनेच्या दोन तासात ताब्यात घेतले. पुढील तपास चंदननगर पोलीस करत आहेत.