बारामती : वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोपडज (ता. बारामती) येथील दरोडा टाकून फरार असलेल्या पाच जणांच्या टोळीला वडगाव निंबाळकर व स्थानिक गुन्हे (ग्रामीण) शाखेच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. तर याप्रकरणातील आणखी ३ आरोपी फरार आहेत.
संदीपान झुंझून्या भोसले, शरद झुंझून्या भोसले (दोघेही रा. पिंपळी, ता. बारामती), अमोल नहाना काळे, (रा. पोबलवाडी, ता. करमाळा, जि. सोलापूर), रितेश अर्जुन काळे, (रा. कासुर्डी, ता. दौड), पांड्या उर्फ पांडुरंग गोरख उर्फ गोरया भोसले (वय-२५, मूळ रा टाकळी, ता. करमाळा, जि. सोलापूर, सध्या रा. कासुर्डी, ता. दौड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर आणखी तीन आरोपी फरार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोपडज ग्रामपंचायत हद्दीत बुधवारी (ता. २८) मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीची घराचे पाठीमागील सेफ्टी दरवाजाचे आतील कडी काढुन घरात प्रवेश केला.
आतील कडी काढुन घरात प्रवेश केला व फिर्यादीचे तोंड हाताने दाबुन चाकुचा धाक दाखवुन ‘तुम चुप रहो, आपके पास जो है, वह दे दो’ असे हिंदीत बोलुन दुसऱ्या आरोपीने फिर्यादीचे गळयातील, हातातील सोन्याचे दागिने तसेच लोखंडी कपाटातील हिरे, सोन्याचे व चांदीचे दागिने व रोख रक्कम ८५ हजार रुपये असा एकुण १० लाख ७७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेहला होता. याबाबत वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरचा गुन्हा हा गंभीर असल्याने गुन्हा उघडकीस आणण्याकरीता जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर व वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या नेतृत्वाखाली दोन पथके तयार करण्यात आली.
सदर घटनेचा पोलीस तपास करीत असताना पोलिसांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली कि, सदरचा गुन्हा हा वरील आरोपींनी केला आहे. त्यानुसार पोलिसांनी वरील पाच आरोपींना ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच गुन्हा करते वेळी आणखी तीन साथीदार असल्याची माहिती पोलिसांना दिली.
दरम्यान, आरोपींकडून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व सोन्याचे कानातील टॉप्स व चांदीच्या पट्टया जप्त केल्या आहेत. आरोपींना गुरुवार (ता.०५) पर्यत पोलीस कोठडी रिमांड मिळाली आहे.
सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक अमित सिद-पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक रविराज कोकरे, बाळासाहेब कारंडे, पोलीस हवालदार स्वप्निल अहिवळे, अभिजीत एकशिंगे, सचिन घाडगे, राजू मोमीन, विजय कांचन, आसिफ शेख, काशीनाथ राजापुरे, वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार सुर्यकांत कुलकर्णी, पोलीस नाईक हिरामण खोमणे, भाउसाहेब मारकड, पोपट नाळे, अमोल भुजबळ, नामदेव साळुंके यांनी केली आहे.