धनंजय साळवे
कवठे येमाई : शिरूर तालुक्यातील अष्टविनायक मार्गावर कवठे येमाई येथे अनेक ठिकाणी चेंबरवरील झाकणे फुटल्यामुळे छोटे-मोठे अपघात होत आहेत. अनेकदा मागणी करूनही संबंधित यंत्रणा याकडे दुर्लक्ष करत आहे.
कवठे येमाई परिसरात चेंबर झाकणे फुटल्यामुळे यामध्ये दुचाकी व चारचाकी गाड्यांची चाके अडकून अपघात होत आहेत. तत्काळ हे चेंबर दुरुस्त करावेत, अशी मागणी पंचायत समिती सदस्य डॅा. सुभाष पोकळे यांनी केली आहे.
ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे चाक या चेंबरमध्ये अडकल्यामुळे एका शेतकऱ्याला नाहक मनस्ताप सहन करावा लागला. गाडी वेगात असेल तर छोट्या-मोठ्या चार चाकी गाड्यांची चाके अडकल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीने मजबूत झाकणे बसवावीत, जेणेकरून अपघात टळतील.
रांजणगाव-ओझर-लेण्याद्री या अष्टविनायक मार्गावरील वाहतुकीत वाढ झालेली आहे. वाहन चालकांना या फुटलेल्या चेंबरचा अंदाज येत नाही. त्यामुळे वारंवार किरकोळ अपघाताच्या घटना घडत आहेत. झाकणे त्वरित बदलण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थ व वाहनचालकांकडून होत आहे.