पुणे : पुण्यात निवृत्त सनदी लेखापालाची तब्बल १२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सायबर चोरट्यांनी निवृत्त सनदी लेखापाल असलेल्या जेष्ठ नागरिकाला पॅनकार्ड अद्ययावत करण्याच्या बहाण्याने फोन करून १२ लाख रुपयांना गंडा घातला. जेष्ठ नागरिक हे पत्नीसह कोंढव्यातील उंड्री परिसरात राहायला आहेत. याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.(cyber Crime )
ज्येष्ठ नागरिक खासगी कंपनीत सनदी लेखापाल म्हणून काम करत होते. २००५ मध्ये कंपनीतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी काही रक्कम आपल्या बँक खात्यात ठेवली होती. त्यांची दोन्ही मुले परदेशात नोकरीनिमित्त स्थायिक झाली आहेत. त्यांच्या मोबाइल क्रमांकावर सायबर चोरट्यांनी संपर्क साधून पॅनकार्ड अद्ययावत करा नाहीतर बँकेतून पैसे काढता येणार नाही, अशी बतावणी चोरट्यांनी जेष्ठ नागरिकांकडे केली.(Pune crime news)
त्यानंतर सायबर चोरट्यांनी त्यांना एपीके (APK)नावाचे ॲप डाऊनलोड करून घेण्यास सांगितलं. हे ॲप घेतल्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून तब्बल ११ लाख ८८ हजार रुपयांची रक्कम चोरट्याने स्वत:च्या खात्यात जमा करून घेतली. त्यानंतर जेष्ठ नागरिकांना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली.(APK APP)
सायबर पोलिसांनी ‘पेयू’ कंपनीशी तातडीने संपर्क साधून त्यापैकी १ लाख ९८ हजार रुपये ज्येष्ठ नागरिकाच्या पत्नीच्या खात्यात पुन्हा वळवली. उर्वरित ११ लाख ८८ हजार रुपयांच्या रकमेवर चोरट्यांनी गंडा घातला. त्यानंतर पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध फसवणूक, तसेच माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष साेनवणे करत आहेत.(Kondhva police)