राशीन : कर्जत पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव व त्यांच्या सहकाऱ्यांची कत्तलीसाठी डांबलेल्या १० जनावरांची सुटका करून कामधेनू गोशाळेत रवानगी केली आहे. तर याप्रकरणी राशीन येथील तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलिम इस्माईल कुरेशी, मुजाहित शकील कुरेशी, सोहेल गफार कुरेशी (तिघेही रा.राशीन ता.कर्जत) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
या तिघांवर कर्जत पोलीस ठाण्यात प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम १२(अ) (ब) ९ व महाराष्ट्र प्राण्यांना वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० चे कलम ३,११ (१) घ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कत्तलीसाठी दहा जनावरे डांबून ठेवली असल्याची माहिती पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी खाजगी वाहनाने घटनास्थळी दुपारी ३ वाजता छापा टाकला. त्यावेळी तिघा जणांनी दहा गोवंश जनावरांना चारा पाण्यापासून वंचित ठेऊन क्रूरपणे डांबून ठेवल्याचे निदर्शनास आले.
या जनावरांमध्ये खिलार गोवंश जातीची अंदाजे १ लाख ३२ हजार किमतीची १० जनावरे कत्तलीसाठीच चालविली असल्याची खात्री झाल्याने पोलीस उपनिरीक्षक शिरसाठ यांनी जागीच पंचनामा करून व जनावरे जप्त करून ती राशीन येथील जनजागृती प्रतिष्ठान संचालित ‘कामधेनू’ गोशाळेत मुक्त केली आहेत. यामुळे मुक्तता केलेल्या जनावरांना जीवदान मिळाले आहे.
ही कारवाई कर्जत पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, पोलिस कॉन्स्टेबल भाऊसाहेब काळे, अमोल लोखंडे, आणि अर्जुन पोकळे यांच्या पथकाने केली आहे.