पुणे : पुण्यात बलात्काराच्या घटना थांबायचं नाव घेईना. शहरातील कोंढवा परिसरातील एका तरुणीसोबत मैत्री करुन तिच्यासोबत प्रेमसंबंध निर्माण केले. त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवले. तरुणीला मंगळसुत्र घालून लग्न केल्याचे भासवून तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार सप्टेंबर २०२२ ते १० फेब्रुवारी २०२४ दरम्यान कोंढवा, उंड्री, वानवडी, सोलापूर या ठिकाणी घडला.
याप्रकरणी विकासनगर, वानवडी येथील १९ वर्षीय तरुणीने १७ फेब्रुवारीला कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यावरुन अनिकेत पुनमचंद राठोड (वय-२७ रा. एस. आर. पी. एफ. गेट समोर विकासनगर, वानवडी) याच्यावर गुन्हा दाखल करुन शनिवारी कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, आरोपीने पीडित तरुणीसोबत ओळख निर्माण करून मैत्री केली. तिच्यासोबत प्रेमसंबंध ठेवले. यानंतर तुझ्यासोबत लग्न करणार असल्याचे खोटे आश्वासन दिले. तसेच मुलीला मंगळसुत्र आणि लग्नातील साज घालून लग्न केल्याचे भासवले. यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात पीडित तरुणी सोबत जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यानंतर आपली फसवणूक केल्याचे लक्षात येताच तरुणीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पुजा पाटील करत आहेत.