पुणे : पुण्यातील हडपसर परिसरात फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून बलात्कार केल्याची घटना घडली आहे. यातून मुलगी ६ आठवड्यांची गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार डिसेंबर २०२३ ते जानेवारी २०२४ या दरम्यान पीडित मुलीच्या घरात घडला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे.
याप्रकरणी हडपसर येथे राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने २० फेब्रुवारीला हडपसर पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन यश सोमनाथ पवार (वय-२२ रा. फुरसुंगी, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करुन ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत आरोपीने दोघांचे एकमेकांसोबत फोटो काढले होते. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. याबाबत कोणाला काही सांगितले तर घरच्यांना जीवे मारण्याची धमकी आरोपीने पीडित मुलीला दिली.
घाबरलेल्या मुलीने याबाबत कोणाला काहीही सांगितले नाही. दरम्यान, पीडित मुलगी सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथे तिच्या आजोळी गेली होती. त्याठिकाणी तिला त्रास होऊ लागल्याने दवाखान्यात तपासणीसाठी नेण्यात आले. त्यावेळी मुलगी ६ आठवड्यांची गरोदर असल्याचे समोर आले.
यानंतर तिच्या आजोळच्या लोकांनी म्हसवड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. म्हसवड पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. हा प्रकार हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्यामुळे म्हसवड पोलिसांनी गुन्हा हडपसर पोलिसांकडे वर्ग केला असून हडपसर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास एपीआय नानासाहेब जाधव करत आहेत.