पुणे : पुण्यातील नाना पेठ परिसरात लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लग्नाचे आमिष दाखवले. तसेच तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर लग्नाला नाकार देऊन तिची फसवणूक केली. या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी एकाला अटक केली आहे. हा प्रकार डिसेंबर २०१८ ते मार्च २०२४ या कालावधीत नाना पेठेतील एका हॉटेलमध्ये घडला.
याबाबत हडपसर येथे राहणाऱ्या ३० वर्षीय तरुणीने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून गजानन जगन्नाथ भवर (वय-३३ रा. तळवडे, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी तरुणी आणि आरोपी गजानन भवर यांची २०१८ मध्ये ओळख झाली होती. त्यानंतर ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. तरुणीला नाना पेठेतील एका हॉटेलमध्ये आरोपी भवर हा घेऊन गेला. त्याठिकाणी तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतरही तो वारंवार तरुणीचे लैंगिक शोषण करत होता.
तरुणीने भवर याच्याकडे लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने लग्न करण्यास टाळाटाळ करुन नकार दिला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने समर्थ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास समर्थ पोलीस करीत आहेत.