पुणे : पुण्यातील हडपसर परिसरातील एका तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. लग्नाचे आमिष दाखवून तरुणीच्या इच्छेविरोधात शारीरिक संबंध ठेवून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार ऑगस्ट २०२२ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत पुणे-सोलापूर हायवेवरील लॉजवर आणि पीडित तरुणीच्या घरात घडला आहे.
याप्रकरणी हडपसर पोलिसांनी एका तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी काळेपडळ येथे राहणाऱ्या २४ वर्षीय तरुणीने २७ फेब्रुवारीला हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून साहिल अविनाश घुले (वय-२५ रा. हडपसर, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपीने मुलीसोबत मैत्री करून तिला लग्न करणार असल्याचे आमिष दाखवले. त्यानंतर तिला पुणे-सोलापूर महामार्गावरील लॉजमध्ये नेऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच पीडित मुलीच्या घरात कोणी नसताना घरी येऊन तिच्यावर बल्टकर केला.
सदर तरुणीने लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने लग्न करण्यास नकार दिला. तसेच शिवीगाळ करुन बघून घेण्याची धमकी दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मुलीने हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. यावरून साहिल घुले याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी करीत आहेत.