पुणे : महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला धमकावून तिच्याकडून एक लाख ३८ हजार रुपये उकळल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एकावर डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुमीत बाळासाहेब जेधे (वय २६, रा. संगमवाडी, येरवडा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलीने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुलीची आरोपी जेधे याच्याशी वर्षभरापूर्वी ओळख झाली होती. पिडीत मुलीला महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचे आमिष आरोपी जेधे यांनी दाखविले होते.
त्यांनी फिर्यादी अल्पवयीन मुलीला आपल्या जाळ्यात ओढले. त्यानंतर डेक्कन भागातील एका हॉटेलमध्ये फिर्यादीला नेऊन त्याठिकाणी तिला शीतपेयातून गुंगीचे ओैषध देऊन बलात्कार केला.
त्यानंतर आरोपी जेधेने फिर्यादीचे मोबाइलवर छायाचित्र काढले. छायाचित्र समाजमाध्यमावर प्रसार करण्याची धमकी देऊन त्याने फिर्यादी मुलीकडून एक लाख ३८ हजार रुपये घेतले. आरोपी जेधे फिर्यादीला सतत धमकावत होता.
त्यानंतर घाबरलेल्या मुलीने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी सुमीत जेधे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.