शिरूर : चायनीजचे हॉटेलच्या मालकाला चाकूचा धाक दाखवून दोघांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. आणि व्यावासायाकाच्या बँकेच्या खात्यातील ८९ हजार रुपये जबरदस्तीने स्वतःच्या बँक खात्यात वर्ग करून घेतल्याची धक्कादायक घटना कारेगाव (ता. शिरूर) येथे घडली आहे. याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.
याप्रकरणी रवींद्र बाबन जेना (वय-४४, रा.कारेगाव, यश-इन चौक मूळ रा. बारभाटिया, ता. कोमलदा जि. बालेश्वर, ओडिसा) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर योगेश सुनिल बारवकर (वय-२७ रा.शिरुर बायपास पाषाणमळा, ता.शिरुर) आणि गौतम छगन शिंदे (वय -३० सध्या रा.यशईन चौक कारेगाव ता. शिरुर, मूळ रा. पिंपरी कोलंदर ता. श्रीगोदा जि. अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी योगेश बारवकर व गौतम शिंदे यांचे चायनीजचे हॉटेल आहे. तर फिर्यादी रवींद्र जेना यांनी हॉटेल व्यवसायाकरिता १ लाख रुपयांचे कर्ज काढले होते. आरोपींनी जेना यांचा मोबाईल हिसकावून घेतला. आणि त्यातील ८९ हजार रुपये आरोपी योगेश बारवकर याने स्वतःच्या बँक खात्यात वर्ग जबरदस्तीने ट्रान्सफर करून घेतले. आणि याबाबत पोलीस स्टेशनला अथवा कुणाकडे तक्रार केली तर “उलटा टांग के काट के फेक दूंगा” असे म्हणून ओप्पो कंपनीचा मोबाईल घेऊन पळून गेला.
दरम्यान, याप्रकरणी रवींद्र जेना यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी दोन्ही आरोपींना शिरुर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुहास रोकडे करीत आहेत.