Rajasthan Crime : पुणे : देशभरात महिलांवरील अत्याचार कही होण्याचे नाव घेत नाहीत. अशातच आता नागरिकांच्या सुरक्षेसाठी असलेले पोलिसच क्रूरकृत्य करत असल्याने एक चिड सर्वसामान्यांच्या मनात निर्माण होत आहे. माणुसकीला आणि खाकीला लाजवेल अशी एक घटना राजस्थानच्या दौसा येथून समोर आली आहे. राजस्थानमध्ये एका पोलीस उपनिरीक्षकाने एका चार वर्षांच्या निष्पाप मुलीवर बलात्कार केला. दौसातील राहुवास पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेने परिसरातील लोकांचा संताप वाढला आहे. दुसरीकडे विरोधकांनीही सत्ताधारी काँग्रेसला घेरलं आहे.
राजस्थानमध्ये घडलेल्या या घटनेमुळे पोलिसांच्या पर्तिमेला पुन्हा एकदा काळीमा फासला गेलाय. भूपेंद्र सिंह नावाच्या पोलीस उपनिरीक्षकाने 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. दौसाच्या पोलीस अधिक्षक वंदिता राणा यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपनिरीक्षक भूपेंद्र सिंह यांना राहुवास पोलीस ठाण्यामध्ये ड्युटीसाठी पाठवले होते.
दुसऱ्या पोलीस कर्मचाऱ्याची भाड्याची खोली घेऊन उपनिरीक्षक भूपेंद्र सिंह राहत होता. यादरम्यान एक चार वर्षांची निष्पाप मुलगी त्या भाड्याच्या खोलीजवळ खेळत असताना उपनिरीक्षकाची नजर त्या निष्पाप मुलीवर पडली. यानंतर त्याने त्या मुलीला आपल्या खोलीत नेऊन तिच्यावर अत्याचार केला. या घटनेच्या निषेधार्थ शेकडो लोकांनी राहुवास पोलीस ठाण्यासमोर येऊन आरोपी उपनिरीक्षकाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.
मिळालेल्या माहितीनुसार, चार वर्षांची मुलगी खेळण्यासाठी घराबाहेर गेली होती. त्यावेळी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या आरोपी उपनिरीक्षकाने मुलीला आमिष दाखवून आपल्या खोलीत बोलावले आणि तिच्यावर बलात्कार केला. यानंतर मुलगी रडत रडत तिच्या आईकडे आली आणि तिने झालेला प्रकार सांगितला. त्यानंतर मुलीचे वडील पोलिस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेले होते. पोलिसांनी उलट मुलीच्या वडिलांना पकडून तुरुंगात टाकले. त्यानंतर मुलीच्या वडिलांना मारहाण करून त्यांचा हात तोडला. यानंतर पोलीस उपनिरीक्षकाने मुलीच्या वडिलांना मुलीला आंघोळ घालण्यास सांगितले जेणेकरून पुरावा पुसला जाईल.