Raigad News रायगड : रायगडच्या खालापूर तालुक्यातील मोरबे धरणाच्या बाजूला असलेल्या इर्शाळवाडीवर दरड कोसळली असून, ढिगाऱ्याखाली अडकून १६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. अनेकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दुर्घटनाग्रस्त गावाला भेट देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिस्थितीचा आणि तेथे सुरू असलेल्या बचावकार्याचा आढावा घेतला. (Raigad News)
बचाव कार्यादरम्यान आतापर्यंत १०३ लोकांची ओळख पटवण्यात प्रशासनाला यश आले आहे. दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत करण्यात येणार आहे. तसेच दुर्घटनेतील जखमींवर मोफत उपचार करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना वाचवण्यासाठी युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे. मात्र, पाऊस, धुके आणि चिखलामुळे मदतकार्यात मोठा अडथळा निर्माण होत आहे. ग्रामस्थांचे तात्पुरते पुनर्वसन करण्यासाठी सध्या डोंगराच्या पायथ्याशी ५० ते ६० कंटेनर्सची व्यवस्था करण्यात आली असून, येथील ग्रामस्थांचे कायमस्वरूपी पुनर्वसन केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
या वेळी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, काही नागरिक भातशेतीच्या कामासाठी इतरत्र गेले असून काही मुले आश्रमशाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. त्यांचाही शोध घेतला जात आहे. दुर्घटनाग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले असून, त्यांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी ५० ते ६० कंटेनर्स आणण्यात आले आहेत. डोंगराच्या पायथ्याशी त्यांची व्यवस्था केली जाईल.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, दुर्घटनाग्रस्तांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांशी चर्चा झाली आहे. त्यासंबंधी पुढील कार्यवाई युद्ध पातळीवर करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. इर्शाळवाडी अत्यंत दुर्गम ठिकाणी वसलेली असल्याने आणि फक्त माणसांच्या मदतीनेच येथे मदत पोहोचवता येणे शक्य आहे.
स्थानिक नागरिक, एनडीआरएफ, एसडीआरएफ, टीडीआरएफ यांच्या पथकांच्या माध्यमातून बचावकार्य सुरू असून, इतर सामाजिक संस्थांनी मदतीचा हात पुढे केला आहे. प्रतिकूल भौगोलिक परिस्थिती आणि सततचा पाऊस अशा परिस्थितीतही लवकरात लवकर मदतकार्य पूर्ण करावे यासाठी शक्य तितके प्रयत्न सुरू आहेत.
माझा वाढदिवस साजरा करू नका : अजित पवार
रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीच्या येथे घरांवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले असून यावर्षी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस असून राज्यभरातील त्यांचे चाहते, कार्यकर्ते, हितचिंतक दरवर्षी मोठ्या प्रमाणावर हा वाढदिवस साजरा करतात. इर्शाळवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कुणीही आपला वाढदिवस साजरा करू नये. पुष्पगुच्छ, होर्डींग, जाहिरातींवर खर्च न करता तो निधी इर्शालवाडी गावाच्या पूर्नउभारणी आणि ग्रामस्थांच्या मदतीसाठी उपयोगात आणावा, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंकडून विचारपूस
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे सतत प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती घेत वेळोवेळी सूचना देऊन मदत कार्यात गती दिली. यावेळी शासकीय यंत्रणांबरोबरच दुर्घटना स्थळाच्या जवळच्या संस्था, यंत्रणा व साहित्य त्यांनी मदत करण्यात सहभागी करून घेतले. ज्यामुळे रात्री शासकीय यंत्रणेसह अनेक स्वयंसेवी संस्था घटनास्थळी पोहोचून बचाव व मदत कार्य सुरू झाले.
घटनास्थळी मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत, मंत्री दादाजी भुसेंची उपस्थित
भूस्ख्खलन झालेल्या इर्शाळगड ठाकूरवाडी येथे मंत्री गिरीश महाजन, मंत्री उदय सामंत, मंत्री दादाजी भुसे यांनी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. या अनुषंगाने मदत कार्याची घेतली माहिती घेऊन प्रशासन व पोलीस मदत कार्यात गुंतलेल्या यंत्रणा, स्वयंसेवी संस्था यांच्या अडचणी दूर करण्यासाठी तातडीने सूचना दिल्या.
प्रशासनाचा ८१०८१९५५४ हेल्पलाईन नंबर
विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी आणि विविध यंत्रणातील अधिकारी मदत करत सहभागी झाले आहेत. खालापूर पोलीस ठाणे हद्दीत चौकाजवळील इर्शाळवाडी येथे घडलेल्या दरड सखलन घटनेच्या अनुषंगाने चौक दूरशेत्र येथे तात्पुरते कंट्रोल रूम तयार करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी प्रशासनाकडून ८१०८१९५५४ हा हेल्पलाईन नंबर देण्यात आला आहे.
मदत पथके तातडीने रवाना
दुर्घटनेनंतर अलिबाग, खोपोली, कर्जत, लोणावळा, बदलापूर, पनवेल, वाशी आणि मुंबई येथून मदत पथके रवाना झाली. आठ ॲम्बुलन्स, ४४ अधिकारी- कर्मचारी, दोन जेसीबी पनवेल नगरपालिका येथून पाठविण्यात आले. कर्जत येथून कळम, आंबिवली, मोहिल आदी प्राथमिक आरोग्य केंद्रचे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. दुर्घटनास्थळी वाहने पोहोचण्यात अडचण असल्याने महाराष्ट्र सह्याद्री ट्रेकर ग्रुप्स, यशवंति हॅकर्स हे देखील या मदत कार्यात सहभागी झाले.