पुणे : अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि ३ मुलींवर विनयभंगप्रकरणी पुण्याच्या माजी आयएएस अधिकाऱ्याला न्यायालयाने ५ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सत्र न्यायालाने शनिवारी (ता.६) सुनावली आहे. त्याचबरोबर १० लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
मारुती हरी सावंत असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मारुती सावंत हे 1998 च्या बॅचचा पदोन्नत झालेले आयएएस अधिकारी होते. त्यांची महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदपुणे येथे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. सावंत हे शिवाजीनगर येथील एका फ्लॅटमध्ये आपल्या कुटुंबासह राहत होते.
मारुती सावंत हे हिंगणे खुर्द येथील शाळेजवळील त्यांच्या सासरच्या अपार्टमेंटमध्ये वारंवार येत होते. अनेक शाळकरी विद्यार्थिनी खेळाच्या मैदानावर खेळायला आल्या होत्या. तेथे सावंत त्यांना बिस्किटे आणि चॉकलेटचे आमिष दाखवत असे. त्यानंतर सावंत मुलींना त्याच्या सासरच्या फ्लॅटवर घेऊन जायचा. त्याच्या संगणकावर अश्लील चित्रफिती बघायला लावायचा आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करायचा. सावंतने मार्च २०१५ मध्ये १३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि अन्य तीन मुलींचा विनयभंग केल्याची घडली होती. याची माहिती मुलींनी त्यांच्या शाळेतील समुपदेशकांना याबद्दल माहिती दिली. समुपदेशक आणि पालकांनी याचे गांभीर्य ओळखत पोलिसांत जाऊन तक्रार दाखल केली.
त्यानंतर सिंहगड पोलीस ठाण्यात मारुती सावंत याच्यावर भारतीय दंड संहिता (IPC)च्या कलम 376, 354, 506 आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याच्या कलम 4, 6, 8, 10 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर सरकारने मारुती सावंत याला सेवेतून निलंबित केले होते.
दरम्यान, पोलिसांनी सावंत यांच्या घराची झडती घेतली असता त्याच्या कॉम्प्युटरमधून जवळपास ३ हजार ५०० अश्लील व्हिडिओ क्लिप्स जप्त केल्या होत्या. त्यानंतर सावंत याला अटक करून कोर्टात सादर करण्यात आले होते. सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील प्रताप परदेशी यांनी युक्तिवाद केला. सत्र न्यायालयाने मारुती सावंत याला पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.