पुणे : विठुरायाच्या भेटीला निघालेल्या पालखी सोहळ्यात दर्शन करण्यासाठी आलेल्या महिलेचे दागिने चोरणाऱ्या महिला आरोपीला हडपसर पोलिसांनी अटक केली होती. परंतु आरोपी महिला हडपसर पोलीस ठाण्यातुन पोलिसांची हातावर तुरी देऊन पसार झाली आहे. याप्रकरणी पोलीस उपायुक्त परिमंडळ-5 आर राजा यांनी कर्तव्यात बेजबाबदार व निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवून महिला पोलीस शिपाई ताराबाई गणपत खांडेकर यांना शासकीय सेवेतून निलंबित केले आहे.
पुण्यातील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मंगळवारी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाला. हडपसर परिसरात दोन्ही पालख्यांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली असता गर्दीचा फायदा घेऊन भाविकांचे दागिने चोरणाऱ्या महिलेला हडपसर पोलिसांनी अटक केली होती.
धुरपता अशोक भोसले (वय-31 रा. टाकळी ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. आरोपी महिलेला सुरक्षेसाठी पोलीस शिपाई ताराबाई खांडेकर यांच्या ताब्यात दिले होते. आरोपी महिलेला पोलीस ठाण्यातील सी.सी.टी.एन.एस रुमध्ये बसवण्यात आले होते. आरोपी खांडेकर यांची नजर चुकवून पोलीस ठाण्यातून पळून गेली. पोलिसांनी तिचा शोध घेतला मात्र ती सापडली नाही.
अटक केलेल्या महिला आरोपीच्या बाबतीत योग्य ती खबरदारी न बाळगता बेजबाबदार व निष्काळजीपणाने, बेपर्वा वर्तन केल्यामुळे आरोपी संधीचा फायदा घेऊन पळून गेली. त्यामुळे पोलीस दलाची बदनामी झाली. त्यामुळे शासकीय सेवेतून निलंबित करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद केले आहे.