पुणे : पुण्यातील एकाला साखर कारखान्यातून स्वस्तात साखर मिळवून देण्याचे आमीष दाखवत त्यानंतर त्याला चाकूचा धाक दाखवून २ लाख ५४ हजार रुपयांना लुटल्याची घटना नगर तालुक्यातील सारोळा कासार शिवारातील रेल्वे स्टेशन परिसरातून उघडकीस आली आहे.
याप्रकणी श्रीकांत सुधीर जोशी (वय 47, रा.आनंदनगर, सिंहगड रोड, पुणे) यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सागर धनराज व त्याच्यासोबत असलेला अनोळखी व्यक्ती यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी जोशी हे व्यावसायिक असून त्यांना सागर यांनी नगरजवळ सारोळा कासार परिसरात साखर कारखाना असून या कारखान्यातून तुम्हाला स्वस्तात साखर मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्या आमीषाला भुलून फिर्यादी जोशी हे अडीच लाखाची रोकड घेऊन सारोळा कासार येथे घेले.
त्यानंतर ते त्याठिकाणी गेले असता, त्यांना दोघांनी चाकूचा धाक दाखवत त्याच्याकडील दोन लाख ५० हजाराची रोकड, १ सॅमसंग कंपनीचा मोबाईल, चांदीची अंगठी व पाकिटातील २५० रुपयांची रोकड असा दोन लाख ५४ हजार ४५० रुपयांचा ऐवज बळजबरीने हिसकावून घेतला.
दरम्यान, जोशी यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी सागर धनराज व त्याच्याबरोबर असलेल्या एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड विधान कायदा कलम ३९२, ४२० प्रमाणे जबरी चोरीच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहे.