लोणी काळभोर, (पुणे) : भोर, पुरंदर तसेच सातारा जिल्हयातील महावितरण कंपनीच्या विदयुत रोहीत्रामधील तांब्याच्या तारा चोरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे (ग्रामीण) शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले.
इमामउददीन शाहाबउददीन खान (वय – २४) जावेद हदीस खान, (वय- ३१), सतराम रामदुलारे चौहाण (वय २४) शफीक अहमद अब्दुलरहीम खान (वय ३३, सर्व रा. तुलसीपूर जि. बलरामपूर राज्य उत्तर प्रदेश सध्या सर्व रा. नर्हे आंबेगाव, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्हयातील भोर व पुरंदर तालुक्यात महावितरण कंपनीचे विदुयत रोहीत्र फोडून तांब्याच्या तारा चोरून नेल्याच्या घटना वारंवार घडत होत्या. त्यामुळे त्या ठिकाणाच्या परिसरात विजेचा पुरवठा खंडीत होवून त्याचा त्रास नागरिक विशेषता तेथील शेतकरी वर्गास होत होता.
सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याकरीता पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना योग्य त्या सूचना दिल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सदर गुन्हयांच्या अनुशगांने तपास करीत असताना, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदाराचे मार्फत बातमी मिळाली की अब्दुल रेहमान खान रा. उत्तर प्रदेश हा भंगारवाला असून तो साथीदारांच्या मदतीने विदुयत रोहीत्र फोडून त्यामधील तांब्याच्या तारा चोरी करत आहे.
मिळालेल्या माहितीचे आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अब्दुल रेहमान अब्दुलरहीम खान,( रा. उत्तरप्रदेश) याला ताब्यात घेवून त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने मित्रांच्या व कामगाराच्या मदतीने विदुयत रोहीत्रामधील तांब्यांच्या तारा चोरी करीत असल्याचे सांगितले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्या सर्व साथीदारांना नऱ्हे भागातून ताब्यात घेतले.
सदर आरोपींकडे पुणे ग्रामीण जिल्हयातील चोरीस गेलेल्या विदुयत रोहीत्राची स्वतंत्रपणे सखोल चौकशी केली असता, त्यांनी पुणे ग्रामीण जिल्हयात १४ ठिकाणी व सातारा जिल्हयामधील २२ ठिकाणी असे वेगवेगळया ठिकाणी एकूण ३६ ठिकाणी ४१ विदुयत रोहीत्र फोडून त्यामधील तांब्याच्या तारा चोरी करून चोरून नेल्याचे सांगितले.
दरम्यान, सर्व आरोपीना गुन्हयांचे पुढील तपासकामी सासवड पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेले असून पुढील तपास सुरू आहे.
सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक पोलीस निरीक्षक राहूल गावडे, पोलीस हवालदार सचिन घाडगे, दत्तात्रय तांबे, विजय कांचन, मुकुंद कदम, अजित भुजबळ, पोलीस कॉन्स्टेबल धिरज जाधव, समाधान नाईकनवरे, अमोल शेडगे यांनी केली आहे.