पुणे – ऑनलाईन लोन ॲपला बळी पडू नका, फसवणूक झाल्यास तत्काळ सायबर पोलिसांशी संपर्क करा. असे आवाहन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणेकरांना केले आहे.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ट्विटरच्या माध्यमातून बुधवारी (ता.२१) पुणेकरांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना वरील आवाहन गुप्ता यांनी केले आहे. या उपक्रमाला पुणेकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
या उपक्रमात नागरिकांनी गुप्ता यांना तब्बल सव्वातीनशे प्रश्न विचारण्यात आले. तर ५०० हून अधिक नागरिकांनी ट्विट केले आहेत. तेव्हा गुप्ता यांनी विविध प्रश्नांना उत्तरे देत नागरिकांचे समाधान केले. यावेळी नागरिकांनी पुण्यातील वाहतूक, सायबर गुन्हेगारी, बालगुन्हेगारी, गुटखा, लोन ऍप खंडणी, गणेशोत्सवातील मिरवणूक अशा विषयांवर प्रश्न विचारले.
नागरिकांनी विचारलेले काही महत्वाचे प्रश्न आणि त्यावर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिलेली उत्तरे खालीलप्रमाणे…
१) प्रश्न : चायनिज लोन ॲपवर कारवाई केली जाते का?
उत्तर : लोन ॲप फसवणूक ही मोठी समस्या असून, त्याला बळी पडू नका. तसे घडल्यास तक्रार द्यायला संकोच बाळगू नका. त्यासाठी आमची सायबर पोलिसांची स्वतंत्र टीम काम करत असल्यामुळे लवकरच त्याचे परिणाम मिळतील.
२) प्रश्न : गुटख्यावर कारवाई का होत नाही? यंत्रणा काय हप्त्यावर चालते का?
उत्तर : माझ्या मोबाइल क्रमांकावर थेट मेसेज करा. त्याचीदखल घेऊन चौकशी अंती कडक कारवाई केली जाईल.
३) प्रश्न : गैरवर्तन करणाऱ्या व अपशब्द वापरणाऱ्या पोलिसांशी कसे वागावे ?
उत्तर : असे प्रकार घडले तर कायदा हातात घेऊ नका. संबंधितांशी न बोलता वरिष्ठांना कळवा. तसेच तुम्ही मला थेट मेसेज करू शकता.
४) प्रश्न : पुणे पोलीस हेल्मेट घालत नाहीत, पण ते नागरिकांना हेल्मेट घालायला सांगतात. हा अन्याय नाही का ?
उत्तर : तुमच्या मताशी मी सहमत आहे. नियम पाळण्याची सुरूवात आपल्या घरापासून होते.
५) प्रश्न : सर आपल्याला वाटत नाही का, की शहरातील नव्या वाहनांची नोंदणी थांबवली पाहिजे ?
उत्तर : मान्य आहे. पुणे शहरात वाहनांच्या संख्येने 2018 मध्ये लोकसंख्येला देखील मागे टाकले. पण या समस्येकडे सर्वांगीन दृष्टीकोनातून पाहण्याची आता गरज आहे.