Pune पुणे : कै . अविनाश आनंद भिडे यांचा २ सप्टेंबर २०२२ रोजी गूढ मृत्यू झाला होता . त्याबाबत तक्रार नोंदविण्यासाठी भिडे कुटुंबीय यांनी अनेकदा पोलिसांकडे चकरा मारून देखील चतुःशृंगी पोलीस गुन्हा दाखल करत नसल्याने, आगामी ४८ तासात गुन्हा दाखल करून तातडीने या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर सरचिटणीस भूपेंद्र मुरलीधर मोरे यांनी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडे केली आहे .दिलेल्या कालावधीत गुन्हा न दाखल झाल्यास उपोषणास बसण्याचा इशारा मोरे यांच्याकडून देण्यात आला आहे.
दिवंगत अविनाश आनंद भिडे वय ३६ वर्षे , रा . निळकंठ अपा , फ्लॅट नं . ५०२ , वडगाव धायरी, पुणे ) हे जोगळेकर प्रा . ली . (दिप बंगला चौक , शिवाजीनगर , पुणे) या ठिकाणी अनेक वर्षांपासून नोकरी करत होते. ही कंपनीचे अधिकृत मालक शेखर माधव जोगळेकर व चिन्मय शेखर जोगळेकर आहेत. ३१ ऑगस्ट २०२२ रोजी शेखर जोगळेकर यांनी दिवंगत अविनाश भिडे यांनी रात्री फोन करून सकाळी कामासाठी बोलावले. १ सप्टेंबर २०२२ रोजी अविनाश भिडे सकाळी ७.३० च्या सुमारास कामावर हजर झाले.
काय प्रकार घडला यांची कल्पना कुटुंबियांना नव्हती…!
त्यानंतर १ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास अविनाश भिडे यांच्या पत्नी यांना फोन आला. यावेळी अविनाश हे चक्कर येऊन पडले असून त्यांना पुढील उपचारासाठी डेक्कन येथील सह्यादी रुग्णालयात दाखल करणार असल्याचे सांगण्यात आले. फोन करणाऱ्या व्यक्तीने यावेळी स्वतःचे नाव सांगण्याचे टाळले. माहिती मिळताच भिडे कुटुंबीय डेक्कन येथील सह्याद्री रुग्णालयात पोहचले. यावेळी दिवंगत अविनाश भिडे यांच्या बरोबर काय प्रकार घडला यांची कल्पना कुटुंबियांना नव्हती .
रुग्णालयातील डॉक्टर यांच्याशी संवाद साधल्यानंतर अविनाश भिडे यांची प्रकृती चिंताजनक असून पुढील उपचार करण्यासाठी आयसीयु मध्ये दाखल करावे लागणार असल्याचे सांगण्यात आले. उपचारांसाठी मोठा खर्च असणार आहे. तयारी असल्यास त्यांना आयसीयुमध्ये दाखल करण्यात येईल अन्यथा त्यांना ससून रुग्णालयात दाखल करावे, असे सांगण्यात आले. यावेळी कंपनीचे मालक शेखर जोगळेकर व त्यांच्या कंपनीतील सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित होते .
आर्थिक अडचण लक्षात घेऊन दिवंगत अविनाश यांना ससून रुग्णालयात हलविण्यात आले व ०२ सप्टेंबर २०२२ रोजी अविनाश मयत झाले .
पोलिसांनी ०३ सप्टेंबर २०२२ रोजी एमएलसी २१३७१/२०२२ दाखल करताना पंचनामा केला
. यात मानेच्या डाव्या बाजूला ६ बाय अर्धा सें.मी. व रखडलेले निशाण दंडावर काळसर डाग , मनगटावर खरचटलेले , पाठीवर लाल काळसर डाग व उजव्या बरगडीवर मारहाणीच्या खुणा असल्याचे पंचनाम्यात नमूद केले आहे.
ही कारवाई चतुःशृंगी पोलिसांनी केली. त्यांनतर ०३ सप्टेंबर २०२२ रोजी एमएलपीएम ५९८४७/२२ नुसार मृत्यू तपासणी अहवालात दिवंगत अविनाश भिडे यांना डोक्याला डाव्या कानाच्या मागे गंभीर स्वरूपाची जखम व शरीरावर मारहाणीच्या खुणा असल्याचे नमूद करण्यात आले आहे .
सदर मृत्यू प्रकरणावर गेल्या आठ महिन्यांपासून भिडे कुटुंबीय वारंवार पोलीसांकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलीस तक्रार दाखल करून घेत नाहीत. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे असून त्यासाठी पोलिसांनी तातडीने तक्रार नोंद घावी , असे आवाहन राष्ट्रवादीचे शहर सरचिटणीस भूपेंद्र मोरे व भिडे कुटुंबीय करत आहेत.
यासंदर्भातील निवेदन पोलीस आयुक्त रितेश कुमार यांना देण्यात आले असून त्यांच्याकडून आगामी ४८ तासात गुन्ह्याची नोंद करावी , अशी मागणी मोरे व भिडे कुटुंबाने केली आहे. अन्यथा पोलीस आयुक्तालयाच्या समोर उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा देखील भूपेंद्र मोरे यांच्या वतीने देण्यात आला आहे .