पुणे : पुणे पोलिसांनी जप्त केलेला ७६१ किलो अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले असून नष्ट करण्यात आलेल्या अंमलीपदार्थाची बाजारभावानुसार ४ कोटी १० लाख ६ हजार रुपये किंमत आहे. या अंमली पदार्थाच्या साठ्याची रांजणगाव येथील एमईपीएल कंपनीच्या भट्टीत विल्हेवाट लावण्यात आली.
यामध्ये गांजा, कोकेन, मेफेड्रोन, चरस, हिरोइन अशा ड्रग्जचा समावेश होता. १६ पोलिस स्टेशनच्या हद्दीत कारवाई करून या अंमली पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला होता. तसेच पुणे शहर आणि परिसरात कारवाई करत पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथक १ आणि २ यांनी २०२२ या वर्षात ७६१ किलो ५७ ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ जप्त केला होता.
जप्त केलेल्या अंमली पदार्थाचा पुनर्वापर होऊ नये साठी हे पदार्थ नष्ट करण्यात आले आहेत. अंमली पदार्थ नष्ट करुन त्याची कशा प्रकारे विल्हेवाट लावली पाहिजे यासंदर्भातील सूचना केंद्र सरकारच्या अर्थ आणि महसूल विभागाने केलेल्या आहेत.