Pune News : पुणे : घरगुती वादातून पत्नीने पतीच्या तोंडावर ठोसा मारून खून केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान वानवडी येथील एका उच्चभू सोसायटीत घडली होती. दुबईला वाढदिवस साजरा केला नाही, तसेच विवाहाच्या वाढदिवसाला भेटवस्तू न दिल्याने हा वाद झाला. या वादात पतीच्या चेहऱ्यावर ठोसा मारून खून करणाऱ्या महिलेला अखेर वानवडी पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने तिला २८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
याप्रकरणी रेणुका निखिल खन्ना (वय ३८) हिला अटक करण्यात आली आहे. निखिल पुष्कराज खन्ना (वय ३६) असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. याबाबत निखिलचे वडील डॉ. पुष्कराज खन्ना यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, निखिल आणि रेणुका यांचा सहा वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. रेणुका मूळची राजस्थानची आहे. ती पतीला व्यवसायात मदत करत होती. सप्टेंबर महिन्यात रेणुकाचा वाढदिवस होता. तिला दुबईला वाढदिवस साजरा करण्याची इच्छा होती. मात्र, पती दुबईला घेऊन गेला नसल्याने ती रागावली होती, तसेच ५ नोव्हेंबरला विवाहाच्या वाढदिवशी पतीने मनासारखी भेटवस्तू न दिल्याने ती रागावली होती. शिवाय रेणुकाला डिसेंबर महिन्यात भावाच्या मुलीच्या वाढदिवसासाठी दिल्लीला जायचे होते. या कारणावरून खन्ना दाम्पत्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते.
दरम्यान, शुक्रवारी दुपारी रेणुका आणि निखिल यांच्यात वाद झाला. रागाच्या भरात रेणुकाने पती निखिल यांच्या तोंडावर ठोसा मारला. त्यानंतर निखिल बेशुद्ध पडले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणात रेणुकाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. आता तिला अटक करण्यात आली आहे. तिला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने रेणुकाला २८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक दत्तप्रसाद शेंडगे तपास करत आहेत.